पूर्वार्ध
‘आलेच गं ममा! एक्कच मिनिट प्लीज! हे एवढं आवरते आणि येतेच.’ सहेली आपण तयार केलेल्या चॉकलेटच्या घरावर फायनल हात फिरवत फिरवत आर्जवली.
‘अगं बाई ती चॉकलेट नि केकची घरं घडवता घडवता तू आपलं घरदार विसरून जातेस! मग उशीर होतो. नि तुला चार घास खायलाही वेळ मिळत नाही. मग आहेतच तुमचे ते पिझ्झेरिया मॅक डी…’ आई तणतणली.
‘नाही हां ममा! शेवटी घरचं ते घरचंच! आणि किती चव आहे तुझ्या हाताला गं! मी अजिबात बाहेर खाणार नाही. घरीच येणारे जेवायला.’ सहेली आईच्या गळय़ात हात टाकत बोलली.
‘तू माहेरी आहेस तोपर्यंत किंमत कळणार नाही तुला या सगळय़ाची. एकदा का हे घर सोडून आपल्या घरी गेलीस की कोणी समोर ताट वाढणार नाही की साधं विचारणार नाही जेवलीस का म्हणूनही.’
‘मग मी जाणारच नाही. जर मला कुणी जेवायचंही विचारत नसेल तर ते घर माझं कसं?’ सहेलीचा अचूक प्रश्न.
‘अगं ते तुझ्या नवऱयाचं घर म्हणजे ते तुझंच घर नाही का? तिथे तू सगळय़ांना विचारायचं जेवणाखाण्याचं आणि सगळंच.’ आई तिला घर जपण्याचा मंत्र देत होती.
‘कमॉन हां ममा! हे माझ्या बाबाचं म्हणजे माझंच घर आहे. काय लावलंय हे आपलं घर, हे घर, ते घर….नुसती घरघर आहे ही!’ म्हणता म्हणता तोंडात पोळीचा रोल कोंबत सहेली पार्सल घेऊन घराबाहेर पडलीसुध्दा. घरघर या शब्दाबद्दल संध्याकाळी तिचं बौद्धिक घ्यायचं ठरवत असतानाच तिच्या आईच्या डोळय़ांसमोर सहेलीचं बालपण सरकू लागलं. भारी आवड पोरीला ‘घर’ या विषयाची! जुन्या ब्लॉकचा हॉल एवढुस्सा होता, किचन चिमुकलं आणि बेडरूमही पिटुकली. त्यातल्या त्यात हॉलच्या कोपऱयात दोन खुर्च्यांवर चादरी पसरून पोरं घर घर खेळायची. तीच आवड पुढे जोपासत सहेली होम डेकॉरच्या फील्डमध्ये शिरली. शिवाय अक्षरशः चॉकलेटचे बंगले बांधण्याच्या ऑर्डर्सही घेऊ लागली. आताचं त्यांचं हे नवं घरही तिनेच हौसेने सजवलं होतं. आणि याच व्यवसायातून तिचं लग्नही जमत आलं होतं. ‘घर’ या विषयावर इतकं प्रेम करणारी मुलगी आपली ‘घरवाली’ करून घेण्यासाठी कित्येक स्थळं उत्सुक होतीच.
‘घर’ या विषयाचा छंद, वेड माणसाला अगदी लहानपणापासूनच असतं ते असं. सहेलीनं आवडीच्या विषयाचं, छंदाचं रूपांतर व्यवसायात केलं हा भाग वेगळा, पण घर घर खेळणं या विषयापासूनच माणसाची आपल्या घराविषयीची ओढ सुरू होते ती शेवटची ‘घरघर’ लागेपर्यंत अखंड असते. अगदी त्यानंतरही माणसाचं घरातलं अस्तित्त्व कधी फोटोच्या रूपाने, नावाच्या रूपाने, सातबारा, फेरफार इत्यादी कायदेशीर मुद्यांवर आणि आठवणींच्या रूपाने शिल्लक राहतच असतं. या वास्तूमध्ये आमच्या चौदा पिढय़ा सुखासमाधानाने नांदल्या आहेत हो! असं अभिमानाने सांगणारी एखादी पणजीआजी आपल्याला एखाद्या जुन्या वाडय़ाच्या माजघरात भेटतेच की! तर ‘आज मला चित्रकलेचा अभ्यास म्हणून घर काढून रंगवून आणायला सांगितलंय सरनी.’ असं सांगणारा शाळकरी गडीही भेटतोच. हे घरप्रकरण इतकं सर्वव्यापी आहे की पत्त्यांचं घर बांधायची अजिबात आवड नाही असा माणूसच मला भेटलेला नाही. वाऱयाची जराशी झुळूकही हे घर जमीनदोस्त करू शकते हे माहित असूनही मोठी माणसंही लहानापेक्षा लहान होऊन ही पत्त्यांची घरं बांधण्याचा आनंद घेत असतात. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ आता फक्त गाण्यापुरता राहिलेला नाही. आता केक, चॉकलेटचीच नव्हे तर भाज्या, गवताच्या काडय़ा, अगदी आइस्क्रीमच्या चमच्यांपासूनही घरं बांधून मिळतात. सारीपाट, सापशिडी किंवा ल्युडोसारखे खेळ खेळतानाही सोंगटी अमुक ‘घरं’ पुढे गेली असा उल्लेख होतो. तिचंही घरच. गंमत म्हणजे Age of Empire, Age of Mythology सारख्या गेम्समध्येही घरं बांधणे हे टास्क असतं. घर या विषयाचं आकर्षणच तसं जबरदस्त आहे. दिवाळीचं जणु घरच असलेला किल्ला बांधण्याची पोरांची आणि थोरांचीही जी धामधूम चालते ती खऱया घरापेक्षा जास्त प्रमाणात उत्साहात असते! नदीकिनारी, समुद्रकिनारी गेलं की एका लाटेत वाहून गेली तरीही वाळूची घरं बांधणं (आणि टिकलीच थोडी, तर मग त्यात खेकडे वगैरेंनी नांदणं!) हे म्हणजे तिथली भेळ खाण्याइतकंच आवश्यक ritual असतं! घराच्या आकाराची घडय़ाळं फारच सुरेख दिसतात. त्यातून दरतासाला डोकावणारे चिमणुले पक्षी तर गोडच! एखादेवेळी घरं प्रत्यक्षात छोटी असली तरी माणसं त्यांना मोठी करतात. शेक्सपिअरच्या नाटकांचा नावापुरताच परिचय असला तरीही टूरवर गेल्यावर त्याचं ते जतन करून ठेवलेलं झोपडीवजा घर ते लोक अभिमानाने दाखवतात. तसंच रत्नागिरीतलं लोकमान्य टिळक जन्माला आले ते घर, थिबा पॅलेस अर्थात थिबा राजाचं घर, कोल्हापूरचं खांसाहेब अल्लादिया खान यांचं जुनं घर लोकं अगदी भक्तिभावाने किंवा जिज्ञासेने पाहत असतील. शनिवारवाडा काय, घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह काय किंवा पाचाडचा मांसाहेब जिजाऊंचा वाडा काय, ही माणसांना रहाण्यासाठी बांधलेली घरंच होती की! ती स्मरणीय झाली ती त्यातल्या देवतुल्य, पराक्रमी, ऋषितुल्य माणसांमुळे! खुद्द घर या आकृतीतही माजघर, स्वयंपाकघर, देवघर अशी घरंच घरं तर असतातच पण बेडरूमसाठीही पूर्वी शेजघर नावाचा शब्द वापरला जात असे. देवळाच्या संदर्भात हा शब्द देवशयनासाठी अजूनही क्वचित वापरला जातो.
घराला सदन, गृह, भुवन, धाम असे काही प्रतिशब्द आहेत. तसंच घरांची शानोशौकत, आब, आकार, मोठेपणा प्रति÷ा दाखवणारेही काही शब्द आहेतच. पाटलांचा खोतांचा तो वाडा असतो. काळवत्री दगडातला, उंच जोत्याचा, अंगावर येणारा, तर सामंतशाहीत किंवा जुन्या युरोपात इतिहासाच्या पुस्तकात दाखवल्याप्रमाणे गढय़ा असतात. सगळं रहस्य पोटात दडवणाऱया! तर राजांचे असतात ते राजवाडे. आपला शाही रुबाब दाखवणारे. धनिक सावकारांच्या हवेल्या, कोठय़ा असतात. आधुनिक श्रीमंतांचे बंगले असतात, पिढय़ानपिढय़ा जुनी असलेली मॅनशन्स असतात. केरळमधील पांढऱयाशुभ्र रंगात रंगवलेली, उत्तम दर्जाचे लाकूड वापरून बांधलेली कौलारू घरं ही पर्यटकांची पसंती असते. मध्यमवर्गीय लोकांची घरं बाहेरून एकसुरी असणारी फ्लॅट असली तरी ऊन, पाऊस, प्रदूषण, माणसांचे स्वभाव जिरवीत पचवीत ती विविधरंगी अंतर असणारी घरं झालेली असतात. आणि इतकंच नव्हे तर त्यांत राहणारी माणसंही मनात आपली खेडय़ातली मूळ घरं जपून असतात. आणि त्या घरातलं वातावरण या घरातही जडवून आणत असतात.
घर कोणतंही असो कोणत्याही प्रकारचं असो, त्याला जी सांभाळते ती गृहिणी. आणि ‘घराला घरपण देणारी माणसं’ अशी ओळ लोकप्रिय होते कारण माणसं रहायला लागल्याखेरीज ते घर होतच नाही. नुसतीच विकाऊ जागा राहते. स्वतःचं घर बांधण्याची इच्छा प्रत्येकाची असली तरी घर बांधणं म्हणजे न संपणारा विषय. म्हणतात ना घर पहावे बांधून! म्हणून ज्याचा स्वभाव किंवा परिस्थिती घर बांधण्याची नसते त्याला ‘घर ना दार देवळी बिऱहाड’ अशी संज्ञा आहे. तर आपल्या घराच्या चार भिंतीत कोंडून न घेणारी माणसं जेव्हा दुसऱयाची कोसळती घरं उभी करण्याचं व्रत आयुष्यभर जपतात तेव्हा ती ‘हे विश्वचि माझे घर’ या भावनेने रहात असतात. अनाथ मुलं किंवा गरजवंत लोकांसाठी घर उपलब्ध होतं तेव्हा त्याचे आश्रम होतात आणि ते चालवणारे प्रामाणिक समाजव्रती हे ऋषीच होय! घर या संकल्पनेचा खरा अर्थ यांना कळलेला असतो. घरात पिढय़ानपिढय़ा एकाच कुळातली माणसं प्रति÷ित म्हणून राहिली की त्याचं घराणं होतं. एवढंच नव्हे तर संगीताचंही घराणंच असतं नि अशी घराणी जेव्हा जोडली जातात तेव्हा ती घरंदाज म्हणजेच प्रति÷ित आणि कुलीन आहेत याची पावती मिळते. गंमत म्हणजे दोन घराण्यांमध्ये रोटीव्यवहार असणं, येणं जाणं, एकमेकांना बोलावणं असणं यालाच घरोब्याचे संबंध असं म्हणतात. आणि जेव्हा बेटीव्यवहार होतो तेव्हा घरोबा केला असं म्हटलं जातं. एखाद्यानं जर दुसरं लग्न केलं तर किंवा अनैतिक संबंध ठेवले तरीही नकारात्मक अर्थाने दुसरा घरोबा केला असंही म्हटलं जातं. म्हणजेच तसं तर प्रत्येक प्राण्याचं पक्ष्यांचंही आपापलं घर असतंच. कासवाची पाठ हे त्याचं घर असतं तर शिंपले आणि शंख हीसुद्धा त्या जिवांची घरंच असतात. कुणी चिखलात घरटं करतो तर कुणी गुहेत. कोणी झाड निवडतं तर कुणी पाण्यालाच घर मानतो. पण गोष्टीतल्या माकडाचं घर मात्र इतक्मया पिढय़ा झाल्या, बांधायचच राहतं आहे! घराचा संदर्भ मनाशीही इतका येतो की एखाद्या गोष्टीनं किंवा व्यक्तीनं मनात घर बांधलेलं असतं. आणि कुणी लागेल असं बोललं तरी काळजाला घरं पडतात. वैर घेताना एखाद्याच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवण्याची भाषा होते. तर कर्ज काढल्यावर घरावरच बोजा असतो. घरातल्या गोष्टी या घरगुती असतात. नि सारखी घरात बसून राहणारी लोकं घरकोंबडी म्हणून ओळखली जातात. कुणी घराला अमुकच नाव ठेवावं म्हणून वाद उकरून काढतात तर कुणी घरावर आपलं नाव कागदोपत्री चढावं म्हणून कोर्टकचेरी करतात. आणि मग घर म्हणजे अमुक क्षेत्रफळाच्या अमुक भिंती आणि छप्पर एवढय़ाच कायदेशीर चौकटीत एक प्रॉपर्टी एवढय़ापुरतंच शिल्लक राहतं.
‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती’ असं म्हटलं आहे ते एवढय़ाचसाठी की घर नुसत्या भिंतींनी बनत नाहीच. तिथली माणसं, त्यांचे एकमेकांशी असणारे अनुबंध, संवादित्त्व, सर्वांच्या भावनांची एकाकारिता, त्यांच्या सहजीवनाचा परिपाक म्हणून असणारा त्या वास्तुपुरुषाचा आशीर्वाद या सर्वांनी मिळून बनतं ते घर आणि त्याचं घरपण, त्याचं व्यक्तिमत्त्व. म्हणून तर सणवार कुळाचारावेळी पहिला नैवैद्य त्या वास्तुपुरुषाला दाखवतात. म्हणून घरात कायम शुभ बोलण्याचा आग्रह असतो. घरात येणाऱयाचं स्वागत करण्याचा दंडक असतो. घरातल्या गोष्टी घराबाहेर जाऊ नये, येणाऱया सुनांनी घर फोडू नये आणि जाणाऱया माहेरवाशिणीने तिचं घर सोडू नये या गोष्टींसाठी घरातली ज्ये÷ कर्ती माणसं चंदनासारखी झिजत असतात. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणून चूक दाखवणाऱया शेजाऱयाशीही प्रेमाचे संबंध ठेवतात. असावे घर ते अपुले छान म्हणून सगळी धडपड असते कारण घर हे बंगला, वाडा, गढी, किल्ला किंवा झोपडी काहीही असो पण त्याला ‘घरपण’ येण्यासाठी हे सगळं राखणं महत्त्वाचं असतं. नाहीतर ‘बंगला नवा नवकोनी’ आणि ‘किति दासी जोडुन पाणि’ असल्या तरीही त्याचा उपयोग शून्य असतो. हल्ली तर बांधलेली घरं अवेळी कोसळण्याच्या इतक्मया घटना घडून आल्या आहेत की कोसळत्या घरांबरोबरच विश्वास नावाची गोष्टही कोसळून नष्ट झाली असल्यास नवल नाही. पुण्यामुंबईसारख्या कित्येक महानगरांमध्ये गृहनिर्माण संकुलांच्या भाराभर जाहिराती रोज दिसत असतात. स्वतःचं घर घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी लाखो लोकं अशा जाहिरातींना भुलून आयुष्याची कमाई त्यात गुंतवतात. वर्षानुवर्षे तो प्रकल्प पूर्ण होतच नाही. एका दिवशी बिल्डर हात वर करून पैसे गिळंकृत करून फरार होतो आणि मनातली इवली घरं जपणारी जिवंत माणसं उध्वस्त होतात. कधी कधी खेडय़ातली माणसं मूळ घर सोडून देशांतराला जाऊन ऊर्जितावस्था प्राप्त करून घेतात. हळूहळू सगळीचजणं बाहेर स्थिरावतात आणि घराकडे बघणारं कुणीच राहत नाही. तर कधी महामारी, अस्मानी सुलतानी संकट येऊन घरंच्या घरं रिकामी पडतात. हळूहळू ती पडूझडू लागतात. शेवटी फक्त चौथरा शिल्लक राहतो. कोकणात अशा चौथऱयाला ‘घरटाण’ अशी संज्ञा आहे. एखाद्या कुटुंबाचा निर्वंश झाल्यास त्याची ‘घरढाकी’ झाली असं म्हणतात. हल्ली तर लग्नसंस्थेलाही भरपूर हादरे बसत आहेत. अशावेळी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणारी जोडपी गुंतवणूक करतानाच हिशेबाने करतात. आणि एका घरात सर्व गरजा भागवणारे अनोळखी म्हणून राहतात. परत वेगळं होताना चिंता नसते किंवा न्यायसंस्था असतेच. पण ‘घर’ मात्र यात भुईसपाट होत जातं. आणि सर्वात कॉमन म्हणजे नोकरी धंद्याच्या निमित्ताने घरातले सर्वच्या सर्व लोकं दिवसाचे बारा पंधरा तास बाहेरच राहतात. आणि उत्तम दर्जाच्या कुलपाची वेसण नाकात अडकवून घर एकटंच आपल्या अंगाखांद्यावर बागडणाऱया लाडक्मया माणसांची वाट बघत राहतं. खरं तर खूप खूप कष्ट करून थेंब थेंब रक्त आटवून माणसं मनातलं घर प्रत्यक्षात आणतात. आणि मग पुढच्या काळात त्याच घरात विसावायला मनाला सवडच राहत नाही. कारण सुट्टया मिळाल्या की ताबडतोब गाडय़ा काढून आउटिंगला जायचं असतं. कधीतरी सुटीच्या दिवशी पावलं घरातच ठेवावीत. घराच्या भिंती, खिडक्मया, दरवाजाकडे प्रेमभराने पाहावं. गॅलरीतून दिसणाऱया चुकार पक्ष्यांशी गप्पा माराव्यात. घरात एका जागी शांत बसून डोळे भरून ‘घर’ नावाची एण्टीटी पाहावी. आपल्या आसपास त्याचं उबदार अस्तित्त्व जाणवेल. ते आपल्याला एवढंच सांगत असेल. हे तुझ्या मनातलं घर आहे ना? आता फक्त घरात मन ठेव!
-ऍड. अपर्णा परांजपे- प्रभु








