मायदेशी परतण्याचा मिळाला अल्टीमेटम : जर्मनीत 8 लाख सीरियन शरणार्थी : उजव्या विचारसरणीचे नेते आक्रमक
वृत्तसंस्था/बर्लिन
सीरियात बंडखोरांनी अध्यक्ष बसर अल-असाद यांची सत्ता संपुष्टात आणली आहे. सुमारे 50 वर्षे सत्तेवर राहिलेल्या असाद परिवाराने आता रशियात आश्रय घेतला आहे. राजधानी दमास्कसवर बंडखोर गटांचा कब्जा झाला आहे. पूर्ण जगात सीरियन लोक याचा जल्लोष करत आहेत. परंतु याचबरोबर त्यांची समस्याही वाढू लागली आहे. गृहयुद्धाच्या काळात स्वत:च्या देशातून पलायन करत आश्रय घेतलेल्या सीरियन शरणार्थींना युरोपमधून परत पाठविण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक युरोपीय देशांनी सीरियाच्या नागरिकांच्या आश्रयाच्या अर्जांना स्थगिती दिली आहे. 2011 मध्ये अध्यक्ष बसर अल-असाद विरोधात बंड सुरू झाल्यावर सीरियन लोकांनी अनेक देशांमध्ये जात आश्रय मिळविला होता. या लोकांसाठी शेजारी देश तुर्किये, लेबनॉन सर्वात चांगला पर्याय ठरला होता. परंतु युरोपीय देशांमध्ये जर्मनीत सर्वाधिक सीरियन शरणार्थी वास्तव्य करून आहेत. संयुक्त राष्ट्रसंघानुसार अधिकृत स्वरुपात ही संख्या 8 लाखाच्या आसपास आहे. तर अनेकांकडे कुठलाही अधिकृत दस्तऐवज नाही.
सीरियन लोकांनी जर्मनीत सर्वाधिक आश्रय घेण्यामागे तत्कालीन जर्मन चॅन्सेलर एंजेला मर्केल यांची धोरणे कारणीभूत होती. सीरियन शरणार्थींवरून त्यांनी जर्मनीची सीमा खुली करत जर्मनी सांभाळून घेईल असा नारा दिला होता. तेव्हा मर्केल यांच्यासोबत सेल्फी घेत चर्चेत आलेले सीरियन शरणार्थी अनस मोदामानी आता जर्मनीचे नागरिक आहेत. त्यांनी आता सीरियात परत जाण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु आता सीरियात असाद सरकारचे पतन झाल्याने जर्मन लोकांच्या मनातील सीरियन लोकांसंबंधी भावना बदलली आहे. जर्मनीत उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी सीरियन लोकांना मायदेशी परतण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. सीरियात आता असाद सरकार नसल्याने आणि बंडखोर सरकार चालवित असल्याने शरणार्थींनी आता मायदेशी परतणे योग्य ठरेल. या शरणार्थींच्या पलायनाचे आता कुठलेच कारण शिल्लक नसल्याचा युक्तिवाद जर्मनीतील नेते करत आहेत.
शरणार्थींना मिळतेय समर्थन
परंतु जर्मनीतील अनेक लोक सीरियन शरणार्थींना समर्थन देत आहेत. जे लोक शरणार्थींना मायदेशी परतण्यास सांगत आहेत, ते मध्यपूर्वेतील वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. ते केवळ स्वत:चे राजकारण चमकवू पाहत आहेत. सीरियातील सद्यस्थिती काय आहे याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही. अशा स्थितीत शरणार्थींवरून अशाप्रकारचे वक्तव्य करणे निंदनीय असल्याचे एका उदारमतवादी नेत्याने म्हटले आहे. मागील 10 वर्षांमध्ये सीरियन लोकांनी जर्मनीत मोठी प्रगती केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या डाटानुसार सद्यकाळात सुमारे 5 हजार सीरियन डॉक्टर जर्मनीत कार्यरत आहेत. याचबरोबर सीरियन लोकांचा रोजगार दर मूळ जर्मन लोकांच्या तुलनेत अधिक आहे. राजकीय चर्चेदरम्यान जर्मन सरकारने सीरियन लोकांना शरण देण्यासंबंधी निर्णयांवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. शरणार्थींना परत पाठविण्यासंबंधी सरकारकडून अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. शरणार्थींवरून काही जण विनाकारण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राइनलँड-पॅलेटिनेटच्या एकीकरण मंत्री कॅथरीना बिंज यांनी केला आहे.
विमान अन् पैसे देण्यास तयार
जर्मनीत जर कोणी फ्री सीरियाचा जल्लोष करत असेल तर त्याने त्वरित सीरियात परत जावे. कारण आता त्याच्या पलायनाचे आणि आश्रय घेण्याचे कारणच संपुष्टात आले आहे, असे उद्गार जर्मनीतील अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनीचे नेते ऐsलिस वीडेल यांनी काढले आहेत. तर अन्य एका नेत्याने सीरियात परतणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. फ्री सीरियाचा जल्लोष करणाऱ्यांनी आता सीरियात परतावे. या लोकांकडे तेथे जाण्यासाठी पैसे नसतील आम्ही त्यांची मदत करण्यास तयार आहोत असे या नेत्याने म्हटले आहे.









