13 वर्षीय मुलीची कमाल
नायला हेयसने वयाच्या 13 व्या वर्षीच यशस्वी होण्याची युक्ती शोधून काढली आहे. ती स्वतःच्या आर्टवर्कला एनएफटीमध्ये (नॉन-फंजिबल टोकन) विकून कोटय़वधींची कमाई करत आहे. नॉन फंजिबलचा अर्थ ओरिजिनल आणि युनिक आयटमशी आहे. मूळ गीत, चित्रफित किंवा चित्र अशा कलाकृती यात मोडतात. नायलाची चित्रे देखील अनोखी असतात.
नायला स्वतःच्या चित्रांमध्ये दिग्गज महिलांना रेखाटते. रुथ बेडर गिन्सबर्गपासून लुसिले बॉल यांची चित्रे तिने काढली आहेत. स्वतःचे चित्र पूर्ण होताच हेयस त्याला एनएफटी वेबसाइटवर पोस्ट करते, जेथून कुणीही क्रिप्टोकरन्सीद्वारे ते खरेदी करू शकतो.
जगातील विविध ठिकाणच्या महिलांची चित्रे काढणे मला पसंत आहे. मला वेगवेगळी संस्कृती आणि विविध पार्श्वभूमी आकर्षित करतात असे नायलाने म्हटले आहे. हेयसने स्वतःच्या कलाकृतीला ‘लाँग नेकीज’ नाव दिले असून तिच्या चित्रांमध्ये संबंधित महिलांची मान लांब असते, यामुळे ही चित्रे वेगळी ठरतात.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये तिच्या चित्रांचा एक विशेष संग्रह सुमारे 9 लाख रुपयांमध्ये विकला गेला होता. तर आतापर्यंत तिने एकूण 53 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
प्रारंभी मी स्वतःच्या पसंतीच्या दोन कॅरेक्टर्स एक महिला आणि एक ब्रोंटोसॉरस यांना एकत्र दर्शवू इच्छित होते. या महिला किती सुंदर आणि बळकट होत्या हे दाखवण्याची इच्छा होती. ब्रोंटोसॉरसबद्दल देखील माझा हाच विचार असल्याचे तिने सांगितले आहे.
मार्च महिन्यात हेयसने स्वतःच्या लाँग नेकी लेडी पोट्रेटला सुमारे 5 लाख रुपयांमध्ये विकले. तर एक महिन्यापूर्वी तिने सुमारे 3 लाख रुपयांमध्ये दुसरे चित्र विकले होते. 2021 मध्ये हेयसला टाइम नियतकालिकाचे ‘आर्टिस्ट इन रेसिडेन्स’चा पुरस्कार मिळाला होता. माझी कला इतकी प्रसिद्ध ठरेल अशी अपेक्षा केली नव्हती. माझ्या आईच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते असे तिने म्हटले आहे.









