वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी पुन्हा भारतावर तोंडसुख घेतला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येला भारत सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी काही काळापूर्वी केला होता. त्यामुळे भारताशी असलेले कॅनडाचे संबंध तणावग्रस्त झाले आहेत. भारताने यानंतर कॅनडाच्या 41 उच्चायोग अधिकाऱ्यांना भारतातून परत न्यावे अशी सूचना कॅनडाने केली होती. त्या सूचनेचे त्या देशाने आता पालन केले आहे. मात्र, भारताच्या या कृतीमुळे कॅनडात असणाऱ्या भारतीयांची हानी होणार आहे, असा नवा आरोप त्यांनी केला.
भारतातून ज्यांना कॅनडाला जायचे आहे त्यांनाही या निर्णयामुळे त्रास होईल. तसेच कॅनडात शिकण्यासाठी राहणाऱ्या भारतीयांनाही अडचणी येतील, असे ट्रूडो यांनी प्रतिपादन केले आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशांनीही उच्चायोग अधिकाऱ्यांच्या संदर्भात कॅनडाचे समर्थक केल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची कृती आंतरराष्ट्रीय संकेताना धरुन नाही असे कॅनडाचे म्हणणे असून अमेरिका आणि ब्रिटननेही भारताच्या या कृतीला अयोग्य मानले आहे. मात्र, भारताने देशाच्या सुरक्षेसाठीच आम्हाला अशी कृती करावी लागल्याचे स्पष्ट केले आहे.









