निवडणुकीमुळे वसूल करण्याकडे कानाडोळा : अनेक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष : जि. पं.च्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
बेळगाव : ग्राम पंचायत, तालुका आणि जिह्याचा विकास व्हायचा असेल तर सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर विसंबून न राहता घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्यातून विकास साधणे गरजेचे आहे. मात्र जिह्यातील अनेक घरपट्टी आणि पाणीपट्टी कोट्यावधीच्या घरात शिल्लक राहिली आहे. ग्राम पंचायतीच्या माध्यामातून गोळा होणारा हा महसूल अनेक विकास कामांवर परिणाम करणारा ठरत आहे. त्यामुळे यासाठी आता विशेष मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील महिना दोन महिन्यांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी सध्या सर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळेही वसूल करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणे शौचालय चळवळ योजना लागू करण्यात आली आहे. त्या प्रमाणे घरपट्टी आणि पाणीपट्टी योजना राबविण्यात आली होती. यासाठी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या सदस्यांबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांनीही यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र ही योजना काही कारणांनी बारगळली असून जिल्ह्dयात कोट्यावधीचा कर थकीत आहे. यामुळे अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेसाठी जनजागृतीही करण्यात आली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांकडून वेळ मारुन नेण्याचे प्रकार
जिह्यातील 500 हून अधिक ग्राम पंचायतींचे करवसुली करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोट्यावधीचा कर पडून आहे. याबाबत नागरिकांनीही दक्षता घेवून कर भरण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. परिणामी याचा फटका विकासकामांना बसतो. ग्राम पंचायतीमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. मात्र त्या यशस्वी होताना दिसून येत नाहीत. यासाठी ग्राम पंचायतकडून आता विशेष लक्ष देण्यात येत असले तरी नागरिक आज भरतो उद्या भरतो, असे म्हणत वेळ मारुन नेत आहेत.
जनजागृती योजनाही बारगळली
तत्कालीन जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा चोळण यांनी एका बैठकीत ‘आमची संपत्ती आमचा कर’ ही नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेंतून तालुक्याबरोबरच जिल्ह्यात सर्वत्रच जनजागृती करण्यात आली. यासाठी एका विशेष पथकाची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान या योजनेमध्ये सर्वांनीच भाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन संबंधित तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र थंडा प्रतिसाद लाभल्याने ही योजना बारगळली आहे.
जिह्यात कोट्यावधीची वसुली शिल्लक
घरपट्टी आणि पाणीपट्टी भरल्यास गावचा विकास कसा होईल याबाबत जनजागृती करण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. य् ाा समितीच्या माध्यमातून जनजागृती आणि वसुली ही दोन्ही कामे करण्यात येणार होती. यासाठी जि., ता. पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या सदस्यांना घेऊन याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रारंभी ही योजना प्रभावीपणे राबविली गेली. मात्र चार महिन्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान ही योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या. मात्र म्हणावा तसा कर गोळा झाला नाही. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र वसुल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सध्या जिह्यात घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली कोट्यावधीची आहे. मात्र ती वसूल करण्यास ता. पं. सदस्य, अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांनी तत्परता दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अजूनही कर वसुलीसाठी प्रयत्न होत आहेत. मात्र नागरिकांतून जनजागृती न झाल्याने ती शिल्लक राहात आहे.









