पंतप्रधानांनी कर्तृत्ववान महिला, पुऊषांशी साधला संवाद ; लोकप्रियतेचे सर्व उच्चांक पार करणारा कार्यक्रम

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रियतेचे सर्व उच्चांक पार करणारा मन की बात हा कार्यक्रम रविवारी तेवढ्याच अमाप उत्साहाने देशभरासह गोव्यातील हजारो लोकांनीही पाहिला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान देशातील एकेका कर्तृत्ववान महिला, पुऊषाशी संवाद साधत होते तेव्हा उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. शतकमहोत्सवी भाग असल्यामुळे यावेळी या कार्यक्रमाला खास महत्व प्राप्त झाले होते. त्यानिमित्त थेट राजभवनसह राज्यभरात तब्बल 1250 ठिकाणी हे प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती व सर्वत्र उत्साही गर्दीत लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची विश्वविक्रमात नोंद व्हावी : मुख्यमंत्री
राजधानीत झेड स्क्वेअर सभागृहात आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची खास उपस्थिती होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ’मन की बात’ कार्यक्रमाची प्रशंसा केली. आजपर्यंत भारतातील किंवा अन्य कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी अशाप्रकारे कोणत्याही कार्यक्रमाचे सलग 100 भाग प्रसारित केलेले नसावेत. त्यामुळे या कार्यक्रमाची विश्वविक्रमात नोंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी ’मन की बात’ केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब बनला आहे. त्याद्वारे पंतप्रधान देशभरातील नागरिकांना आपल्या मनातील गोष्टी सांगतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. तानावडे यांनी बोलताना, मन की बात च्या शतकमहोत्सवी भागास राज्यभरातून जनतेचा उत्साही प्रतिसाद लाभला असे सांगितले. पक्षाचे खासदार, सर्व आमदार, मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात, मतदारसंघात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. त्याला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
जनतेचा उत्साह हा ’मन की बात’ च्या अभूतपूर्व यशाचा पुरावा : राज्यपाल
राजभवनवर झालेल्या कार्यक्रमास सुमारे 400 लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यात प्रामुख्याने पद्मश्री पुरस्कार प्राप्त सद्गुरू ब्रह्मेशानंदचार्य स्वामी, ब्रह्मानंद शंखवाळकर, विनायक खेडेकर यांच्यासह मन की बात मध्ये उल्लेख झालेले सागर नाईक मुळे, गुऊदत्त वांतेकर, आदी, विविध कलाकार यांचा समावेश होता. त्यावेळी बोलताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी, मन की बात’ हा लोकसंपर्क आणि संवादाचा सर्वात मोठा बिगर राजकीय आणि सकारात्मक कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचा साजरा होत असलेला उत्सव म्हणजे, उज्वल भविष्यासाठी भारतीयांना प्रेरणा आणि उत्तेजन देण्यात मन की बात ने दिलेल्या अभूतपूर्व योगदानाचा पुरावा आहे. तसेच हा कार्यक्रम म्हणजे देशाने आजवर मिळवलेल्या सर्वात मोठ्या यशापैकी एक असल्याचेही पिल्लई यांनी नमूद केले.
गुजरात दिवस साजरा
दरम्यान, मन की बातच्या शतकी भागाचे प्रसारण आणि त्याच दिवशी आलेल्या गुजरात स्थापना दिनाचे औचित्य साधत भाजपातर्फे ’एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत गुजरात दिवसही साजरा करण्यात आला. झेड स्क्वेअर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास गुजराती समाजामधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर गोव्याच्या विकासात या समाजाच्या योगदानाची दखल घेत सरकारकडून वेळोवेळी आवश्यक सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली. समाजातील काही मान्यवरांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्कारही केला. गोवा आणि गुजराती सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस दामू नाईक, संदेश साधले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.









