कोणत्याही श्रीमंत व्यक्तीकडे नोटांचा गठ्ठा आढळला तर ते स्वाभाविक आहे. कारण असे गठ्ठे त्याच्याकडे असतात, म्हणून तर तो श्रीमंत म्हणून ओळखला जात असतो. पण कचऱ्यातून धातूचे किंवा प्लॅस्टिकचे तुकडे उचलून ते विकून गुजराण करणाऱ्या भंगार विक्रेत्या मुलांकडे नोटांचे गठ्ठे सापडले तर ती केवळ आश्चर्यकारक नव्हे, तर काहीशी संशयास्पद घटनाही असू शकते.
सध्या असा एक व्हिडीओ चर्चेत आहे. एका भंगाराच्या दुकानात काही मुले भंगाराची विक्री करीत आहेत. त्यांच्याकडे 500 रुपयांच्या नोटांचे गठ्ठे असलेले दिसून येतात. ही मुले हे गठ्ठे फडकावित आहेत. एक अन्य मुलगा त्यांच्याकडे एक नोट मागताना दिसतो. ही मुले त्याला त्या गठ्ठ्यातून दोन नोटा काढून देताना दिसून येतात. भंगाराच्या विक्रीतून लक्षाधीश झालेली माणसे नाहीत असे नाही. अनेकांनी असा व्यापार करुन त्यातून अमाप संपत्ती मिळविली आहे. तथापि, लहान मुलांकडे इतके पैसे असावेत, हे आश्चर्यकारक असल्याचे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटते. तथापि, वस्तुस्थिती अशी आहे, की या नोटा सध्या चलनात नाहीत. निश्चलनीकरणाच्या काळात ज्या 500 आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्या नोटांचे काही गठ्ठे या मुलांना कचरा उचलताना मिळाले होते. व्हिडीओत पाहताना ते सध्याच्या 500 च्या नोटांसारखे वाटतात. पण प्रत्यक्षात या कालबाह्या नोटा असल्याचे बारकाईने पाहिल्यास दिसून येते. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या निश्चलनीकरणाच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या असून त्यांनी या व्हिडीओखाली तशा काँमेंटस् केलेल्या आहेत, असे दिसून येत आहे.









