गाईसह काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज दूध उत्पादक संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून गाईचे पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध दरात प्रतिलिटर चार रुपये आणि तीन रुपये अशी दोन वेळा कपात केली आहे. ही कपात थांबवावी आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर सरकारने सात रुपये अनुदान जाहीर केले, ते कायमस्वरूपी लागू करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान सरकारने अनुदान दिलं नाही तर शेतकरी उग्र आंदोलन करतील, असा इशारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतीराम घोडके यांनी दिला आहे.









