सांगेली गुरगुटवाडी येथील घटना
ओटवणे प्रतिनिधी
गोठ्यातून थेट म्हशीवर वीज पडून दुभती म्हैस जागीच गतप्राण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सांगेली- गुरगुटवाडी येथे घडली. या घटनेत जानू नवलू पाटील यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांना धक्काच बसला.
बुधवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यासह सांगेली परिसरात विजेचा तांडव सुरु होता. याचवेळी गोठ्यात बांधलेल्या जानू नवलू पाटील त्यांच्या दुभत्या म्हशीवर गोठ्यातून थेट वीज कोसळली. यावेळी गोठ्यालगतच्या पाटील कुटुंबीयांना वीज कोसळल्याचा आवाज आला. मात्र काही क्षणातच म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून पाटील कुटुंबीयांना धक्काच बसला.
सांगेली सरपंच लवू भिंगारे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, तलाठी श्री कुडतरकर, पशुवैद्यकीय अधिकारी श्री जाधव यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पंचनामा करून शव विच्छेदन करण्यात आले. पाटील कुटुंब यांना कुटुंबीयांना शासनाकडून योग्य भरपाई देण्यात यावी अशी मागणी सरपंच लवू भिंगारे यांनी केली आहे.









