मध्यप्रदेशातील रतलाम येथे भाजप कार्यकर्त्यांनी एका उमेदवाराचा दुग्धाभिषेक केला आहे. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित असल्याचे म्हणत अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रतलाम येथील ग्रामीण मतदारसंघातील आहे. येथे भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवार मथुरालाल डामर यांचा विजय निश्चित मानून त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला आहे. कार्यकर्त्यांनी डामर यांना कुंडात बसून त्यांच्यावर दुधाचा वर्षाव केला आहे.
रतलाम ग्रामीण मतदारसंघात यावेळी त्रिकोणी लढत आहे. येथे काँग्रेस आणि अन्य एका पक्षाचे उमेदवार परस्परांच्या मतपेढीला धक्का पोहोचवित असल्याने भाजप स्वत:चा विजय निश्चित मानत आहे. आदिवासी भागांमध्ये गरीबीचे प्रमाण अधिक असल्याने भाजप नेत्याच्या दुग्धाभिषेकाचा मुद्दा काँग्रेसने लावून धरला आहे. मथुरालाल डामर 2013 मध्ये या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. 2018 मध्ये भाजपने डामर यांना उमेदवारी नाकारली होती. परंतु भाजपने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे.









