दबक्या आवाजात सुरू असणारी दुध भेसळीची उघड चर्चा सुरू झाली
सांगली : शरीराला पोषण देणारे दूधच जर विषासमान ठरत असेल, तर सर्वसामान्यांचा जगण्याचा हक्कच धोक्यात येतो. दूध भेसळीच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात दुध भेसळीची प्रात्यक्षिकासह पोलखोल केली.
त्यामुळे आजपर्यंत दबक्या आवाजात सुरू असणारी दुध भेसळीची उघड चर्चा सुरू झाली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सांगली जिल्हा हा राज्यातील दूध उत्पादनाचा एक प्रमुख केंद्रबिंदू आहे.
जिल्ह्यात दररोजचे दूध उत्पादन सुमारे २५ ते ३० लाख लिटर आहे. दररोजची स्थानिक गरज सुमारे ८ ते १० लाख लिटर आहे. त्यातून शिल्लक राहिलेले दुध मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारासारख्या शहरांकडे विक्रीसाठी पाठवले जाते. राज्यातील दुध उत्पादनाचा विचार करता राज्यात प्रतिदिन सरासरी सुमारे २.५ कोटी लिटर दुधाची गरज असते.
राज्यात दुधाचे सुमारे ३ कोटी लिटर उत्पादन होते. ५० लाख लिटर दूध शिल्लक राहते. ते दुध प्रक्रिया केंद्रे, पावडर युनिट्स किंवा शहरांमध्ये खपवले जाते.
दूध वापरल्याने होणारे परिणाम
लहान मुलांमध्ये पोषणतुट, पचनसंस्थेचे विकार, दूध भेसळीचे वाढते प्रमाण एक गंभीर आरोग्य धोका अन्न व औषध प्रशासनच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी तपासलेल्या दूधाच्या नमुन्यांपैकी १० टक्के ते १५ टक्के नमुने भेसळयुक्त आढळतात. काही जिल्ह्यांत हे प्रमाण २५ टक्क्यापर्यंत जाते. दुधात मिसळल्या जाणाऱ्या घातक पदार्थामुळे मानवी आरोग्यावर थेट परिणाम होतात.
डिटर्जेंट, युरिया, सिंथेटिक दूध तयार करणारी रसायने, स्टार्च, सोडा, वनस्पती तूप, फॉर्मलिन, हायड्रोजन पेरॉक्साईड (दूध टिकवण्यासाठी) या पदार्थाच्या दुधातून होणाऱ्या सेवनामुळे परिपूर्ण असलेल्या अन्नाचे विष झाल्याची स्थिती आहे. प्रौढांमध्ये यकृत व मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका, दीर्घकालीन वापराने कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार भेसळीविरोधात काय कारवाई
पहिल्या गुन्ह्यासाठी ५ लाखापर्यंत दंड आणि ६ महिन्यांपर्यंत कारावास, पुनरावृत्ती झाल्यास ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास, गंभीर भेसळ असल्यास आजीवन कारावासाची तरतूद आहे.
घरच्या घरी करा भेसळीची तपासणी
ग्राहकांना घरच्या घरी दुधामधील भेसळीची चाचणी करता येते.
पाण्याची भेसळ : थोडे दूध पातेल्यात टाकल्यास थेट खाली बसले पाहिजे.
डिटर्जेंट : पाण्यात फेस आला तर भेसळ, स्टार्च: आयोडीन टाकल्यास निळसर रंग.
फॉर्मलिन: साधारण गृहचाचणीत ओळखणे कठीण.
भेसळीचा कायदा कडक करावा : आ. पडळकर, आ. खोत
दुध भेसळीमुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही. शहरी भागातील लोकांना भेसळमुक्त दुध मिळत नाही. खासगी व्यावसायिक आणि संकलक दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ करत असल्याचा आरोप आ. गोपीचंद पडळकर आणि आ. सदाभाऊ खोत यांनी केला. भेसळ थांबली पाहिजे. यासाठी अन्न औषध प्रशासन विभागात अधिकाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. भेसळखोरांवर कारवाईसाठी कायदा कडक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुध भेसळीसंदर्भात अन्न औषध प्रशासन सतर्क : मसारे
दुध भेसळी संदर्भात सांगली अन्न औषध प्रशासन विभागाने गेल्या दोन वर्षात राज्यात सर्वाधिक नमुने – तपासणी केली आहे. दोन वर्षात ३५० हून अधिक – नमूने तपासणी केले. त्यामध्ये चार नमूने असुरक्षित – असून १७ नमून्यांचे दूध कमी दर्जाचे आहे. तर २३ – नमून्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी निलेश मसारे यांनी दिली.
शेतकरी भेसळ करत नाही: संजय कोले
आज राज्यात दुधाचे उत्पादन आणि दुधाची मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाइतकेही पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांनी दूध उत्पादनासाठी पशुपालन बंद करून विकतचे दूध घेण्यास सुरवात केली आहे. सरकारने दरवर्षी दुधाचे दर पाडण्याचे धोरण बंद करावे अन्यथा शहरी भागाला भेसळीचेच दुध प्यावे लागेल. असे स्पष्ट मत शेतकरी नेते संजय कोले यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातून रोजगाराच्या निमीत्ताने शहरात येऊन स्थायिक झालेल्या परिसरात भेसळीचे दुध मोठ्या प्रमाणावर खपते. शहरी भागातील गरिबांना हे भेसळीचे दूध विक्री करण्यात येत असल्याने आरोग्याचेही प्रश्न गंभीर बनत चालल्याचेही कोले यांनी सांगितले. ग्राहकांनीही दुधासह सर्वच शेतमाल स्वस्त दरात म्हणजे उत्पादन खचपिक्षाही कमी दरात खरेदी करण्याची मानिसकता बदलावी असे आवाहनही त्यांनी ‘तरूण भारत संवादशी बोलताना केले.








