18 व्या फेरीतील कोअर कमांडर स्तरीय चर्चा
वृत्तसंस्था / चुशुल
3 वर्षांपासून सीमेवर सुरू असलेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात चुशुल येथे रविवारी कोअर कमांडर स्तरीय 18 व्या फेरीतील चर्चा पार पडली आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व फायर अँड फ्यूरी कॉर्प्स कमांडर लेफ्टनंटर जनरल राशिम बाली यांनी केले आहे. तर चीनकडून समकक्ष रँकचे अधिकारी या बैठकीत सामील झाले. ही बैठक 5 महिन्यांच्या अंतराने झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान कोअर कमांडर स्तरीय अखेरची बैठक यापूर्वी डिसेंबर महिन्यात झाली होती.
दोन्ही देश आपाआपली स्थिती मजबूत करण्यासाठी सीमावर्ती क्षेत्रांमध्ये वेगाने निर्मितीकार्ये करत असताना ही बैठक पार पडली आहे. भारताकडून देपसांगचे मैदान, डेमचोक तसेच दोन्ही देशांच्या सैन्याच्या माघारीचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जैसे थे स्थिती बदलण्यासाठी अवजड शस्त्रास्त्रs अन् मोठ्या संख्येत सैनिक तैनात करण्यात आल्याने पूर्व लडाख क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.
दोन्ही देश सैन्य आणि राजनयिक माध्यमातून चर्चा सुरू ठेवण्यावर आणि लवकरात लवकर उर्वरित मुद्द्यांवर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यावर सहमत झाले आहेत. परंतु संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी चीनकडून कुठलेच विशेष प्रयत्न होत नसल्याचे मानले जात आहे. चीन देपसांग मैदानासारख्या अनेक मुद्द्यांवरील चर्चा रोखून धरत आहे. तसेच भारतीय गस्तपथकाला संबंधित क्षेत्रातील गस्त बिंदूंवर जाण्यापासून चीन रोखत आहे.
चिनी संरक्षण मंत्र्यांचा दौरा
चीनचे संरक्षणमंत्री पुढील आठवड्यात दिल्लीत आयोजित होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. चीनकडून जैसे थे स्थिती बदलण्याच्या कुठल्याही प्रयत्नाला रोखण्यासाठी भारतानेही सीमेवर मोठी जमवाजमव केली आहे. भारतीय सैनिकांनी यांग्त्से येथे चिनी सैन्यतुकडीला घुसखोरी करण्यापासून रोखले होते.









