वृत्तसंस्था/ खार्तूम
सूडानमध्ये सैन्य अन् निमलष्ली दल आरएसएफ यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. याचदरम्यान सूडानच्या दारफूरमध्ये शनिवारी रात्री रॉकेट हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सैन्य अन् निमलष्करी दलाच्या संघर्षात दोन्ही बाजूंकडून रॉकेटचा वर्षाव करण्यात आला. रॉकेट हल्ल्यात मारले गेलेले सर्वजण सामान्य नागरिक होते.
दक्षिण दारफूरमध्येच हा संघर्ष प्रामुख्याने झाला आहे. संघर्षादम्यान काही स्नायपर शुटर्सनी गोळीबार देखील गेल्याने अफरातफरीची स्थिती निर्माण झाली. सैन्य आणि आरएसएफ यांच्यातील संघर्षामुळे हजारोंच्या संख्येत लोकांनी पश्चिम दारफूरमधून पलायन केले आहे. शेजारील देश चाडच्या सीमपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
दारफूरच्या अन्य क्षेत्रांमध्येही संघर्षाची झळ पोहाचू शकते अशी भीती आता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत मृतांची संख्या वाढण्याचा धेका आहे. सूडान पूर्णपणे युद्धाच्या तडाख्यात सापडू शकतो, यामुळे मोठे नुकसान होऊ शकते असा इशारा काही आठवड्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने दिला होता. मागील आठवड्यात ओमडुरमॅन शहरातील एका भागात झालेल्या हवाई हल्ल्यात अनेक जण मारले गेले होते.
15 एप्रिल रोजी सूडानची राजधानी खातूर्ममध्ये सैन्य अन् निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सेसमध्ये संघर्ष पेटला होता. हा संघर्ष आता दारफूरपर्यंत फैलावला असून देशात आतापर्यंत 3 हजार लोक मारले गेले आहेत. देशाच्या सत्तेवर कब्जा करण्यासाठी सैन्य अन् आरएसएफमध्ये ही लढाई सुरू आहे. सूदानी सैन्याचे प्रमुख अब्देल फतह अल-बुरहान अन् आरएसएफ कमांडर मोहम्मद हमदान डागलो यांच्या हट्टामुळे देश युद्धाच्या आगीत होरपळून निघत आहे.









