ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांच्या निधनाने एका धगधगत्या संघर्षपर्वालाच विराम मिळाला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या यादव यांनी बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशसह सबंध देशाच्या राजकारणावर मागची जवळपास पाच दशके टाकलेला प्रभाव हा एक अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा. त्यांच्या सबंध जीवनप्रवासावर नजर टाकली, तर त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती, संघर्षशीलता, वैचारिकता, चिकाटी व मुरब्बीपणाचाच पुरेपूर प्रत्यय येतो. जबलपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश, इंजिनिअरिंगमध्ये पटकावलेले सुवर्णपदक यातून त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची ओळख पटतेच. किंबहुना, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांतून प्रेरणा घेत एक विद्यार्थी कोवळय़ा वयातच किती मोठी भरारी घेतो, याचेही दर्शन घडते. भारताच्या आधुनिक राजकारणातील प्रतिभाशाली राजकारणी, विचारवंत ही डॉ. लोहिया यांची ओळख. गरिब-श्रीमंतांमधील दरी, जातीय विषमता, स्त्री-पुरुष असमानता, यांसह अभावग्रस्तांच्या प्रश्नांवर डॉ. लोहियांनी आयुष्यभर काम केले. लोहियांच्या समाजवादी विचारांच्या प्रभावातून अनेक तरुण भारतीय राजकारणात आले. त्यापैकी शरद यादव हे एक होत. विद्यार्थी आंदोलनातूनच लोहिया यांच्या या शिष्याचे नेतृत्व पुढे आल्याचे दिसते. 1971 मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक त्यांनी लढविली नि जिंकलीदेखील. मिसा कायद्याअंतर्गत झालेल्या अटकेतून त्यांच्या नेतृत्वाला खऱया अर्थाने पैलू पडले, असे निश्चित म्हणता येईल. मुळात हा सगळाच कालखंड भारावलेला. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन त्या वेळी ऐन भरात होते. याच काळात काँग्रेसचे खासदार शेठ गोविंद दास यांच्या निधनाने जबलपूरची जागा रिक्त झाली होती. याच जागेवरून जेपींनी शरद यादव यांची उमेदवारी जाहीर केली. विरोधी पक्षांचा उमेदवार म्हणून मैदानावर उतरलेल्या या लढवय्या 27 वर्षांच्या तरुणाने या निवडणुकीत इतिहास घडवत विरोधकांच्या एकजुटीचा पहिलावहिला प्रयोग यशस्वी करून दाखविला. आणीबाणीनंतर 1977 मधील सार्वत्रिक निवडणुकीत झालेला काँग्रेसचा पराभव व जनता पक्ष सत्तेवर येण्याचा चंचुप्रवेश म्हणूनही या विजयाकडे पाहता येईल. 1977 मध्ये पुन्हा जबलपूरमधूनच निवडून आलेल्या शरद यादव यांनी 1989 मध्ये यूपीतील बदायूं लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. तर 1991 ते 2014 दरम्यान त्यांनी बिहारमधील मधेपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. देशातील तीन राज्यांमधील वेगवेगळय़ा लोकसभा मतदारसंघातून एखादा नेता विजयी होतो आणि त्या भागात आपले वलय निर्माण करतो, हे मुळात राजकारणातील आश्चर्य ठरते. यातून यादव यांची राजकीय झेपच ध्यानात येते. त्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा स्वभाव. संजय गांधी यांच्या निधनानंतर 1981 च्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे त्यांनी दाखविलेले धाडस हा त्याचाच नमुना. यात त्यांचा मोठय़ा फरकाने पराभव झाला असला, तरी त्यातून त्यांचा लढवय्येपणाच अधोरेखित होतो. 1989 मध्ये सत्तेवर आलेल्या व्ही. पी. सिंह सरकारमधील त्यांची भूमिकाही महत्त्वाची होय. या काळात सिंह यांना साथ देण्याचे काम त्यांनी केले. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या कामातही त्यांनी महत्त्वाचा रोल निभावला. वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेचे प्रतिनिधी, जनता दल अध्यक्षासह केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री, नागरी उड्डयनमंत्री, केंद्रीय कामगारमंत्री अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. चारित्र्यवान नेते, हीदेखील त्यांची ओळख. हवाल्यात नाव आल्यानंतर तत्काळ खासदारकी सोडून त्यांनी आपल्यातील ही तत्त्वनिष्ठता दाखवून दिली होती. तसे लालू व ते लोहियांचे अनुयायी. मात्र, दोघांच्या मैत्रीत नंतर दरी निर्माण झाली. जनता दल अध्यक्षपदाची निवडणूक यादव यांनी जिंकल्याने पुढे लालूंना राष्ट्रीय जनता दल हा नवा पक्ष स्थापणे भाग पडले. दुसऱया बाजूला 1998 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकार्याने संयुक्त दलाची केलेली स्थापना, त्यातील नितीशकुमार यांचा प्रवेश, वाजपेयी सरकार अस्तित्वात आल्यानंतर विविध समित्यांसह मंत्री म्हणून काम करण्याची मिळालेली संधी या साऱयाचे त्यांनी सोने केले. 2012 मध्ये उत्कृष्ट संसदपटू किताबाने गौरविण्यात आलेल्या या नेत्याची भाषणे ऐकणे, हा एकप्रकारचा अभ्यास असे. एनडीएचे समन्वयक असलेल्या यादव यांनी 2013 ला नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर मात्र आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एखाद्या मुद्दय़ावर तडजोड नाही म्हणजे नाहीच, असा त्यांचा पिंड होता. या प्रकरणात तेच दिसून येते. नंतर नितीशकुमार यांच्याशी त्यांचे झालेले मतभेदही याच पठडीतले. अर्थात नितीश यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यांची पुन्हा दिलजमाई झाल्याचे दिसले. त्याचबरोबर लालू प्रसाद यादव यांच्याशी असलेले राजकीय शत्रुत्व संपवत त्यांनी आपला लोकतांत्रिक जनता पक्ष राजदमध्ये विलीन केला. तसे त्यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधी राजकारण केले. मात्र, लोकशाही मूल्ये, उदारमतवादाचा विचार करता भाजपपेक्षा काँग्रेस बरी, या निष्कर्षाप्रत ते आले होते. मुळात सत्तेला अंगावर घेणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. काँग्रेसला प्राणपणाने विरोध करणाऱया या नेत्याने अलीकडेच भाजपाविरोधही तीव्र केला होता. नव्या प्रयोगाची पायाभरणी होण्यापूर्वीच देशाच्या राजकारणातील या प्रभावशाली नेत्याने एक्झिट घेणे धक्कादायक आहे. या लढवय्या समाजवाद्यास भावपूर्ण आदरांजली.
Previous Articleकेनिनला हरवून कोसीरेटो अंतिम फेरीत
Next Article नोरी-गॅस्केटमध्ये अंतिम लढत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








