रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात असलेल्या काशीद समुद्रकिनाऱ्यावर कल्याण येथील मायलेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या डोर्थी बेंजामिन फॅब्रिक (७३) व त्यांचा मुलगा विजय लिओनेल अल्फ्रेड (४७) हे दोघे काशीदजवळच्या पूर्वी चिकणी समुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनाऱ्यावरील कावळा भागात पोहण्यास गेले होते. पाण्यामध्ये पोहत असताना अंदाज न आल्याने तसेच समुद्रातील लाटांच्या प्रवाहात सापडल्याने त्यांच्या नाकात तोंडामध्ये पाणी जाऊन बेशुद्ध पडले. या दोघा मायलेकांना त्वरित रुग्णालयामध्ये आणले असता तेथे डॉक्टर आणि त्यांना मृत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत मायलेक हे दोघेही कल्याणमधील टीएमसी शाळेजवळ धनगरगाव शिळसती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांजवळ असलेल्या आधारकार्ड वरून पोलिसांनी त्या पत्त्यावर चौकशी केली असता त्यांचे कोणतेही नातेवाईक आढळून आले नाहीत. त्यामुळे या दोघांचे शव वाशी येथील सभागृहामध्ये ठेवण्यात आले आहेत. ते मुरुड येथे येताना स्वतःची कार घेऊन आले होते. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरच कार पार्क करून ठेवली होती. या घटनेचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अविनाश झावरे व सागर रोहेकर करत आहेत.








