जिल्हा प्रशासन, पोलीस खात्याची माहिती, 80 आंदोलक ताब्यात : हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हे नोंद
बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलनासाठी कोंडुसकोप येथे जागा निश्चित करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठानेही तशा प्रकारचा आदेश दिला असताना न्यायालयाचा आदेशाचा तसेच पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेचे उल्लंघन करत महामार्ग रोखण्यात आला. याबाबत आदोलनकर्त्यांना सातत्याने समाजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकले नाही. उलट बॅरिकेड्स ढकलून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. यामध्ये 14 पोलीस जखमी झाले असून 10 आंदोलक जखमी झाले आहेत. या प्रकरणी 70 ते 80 जणांना ताब्यात घेण्यात आले असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस महानिरीक्षक विकासकुमार विकास, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंगळवार दि. 10 रोजी रात्री जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याच्यावतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पंचमसाली समाजाच्या आंदोलनासाठी कोंडसकोप्प येथे जागा निश्चित करण्यात आली होती. आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. मात्र त्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाद मागितली. त्याठिकाणी न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्यास मुभा द्यावी, ट्रॅक्टर आणण्यात येऊ नयेत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, असा आदेश बजावण्यात आला होता.
मात्र या आदेशाचे उल्लंघन करत आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना त्याठिकाणी लावण्यात आलेल्या 30 बॅरिकेड्सची मोडतोड करण्यात आली. तुफान दगडफेक सुरू झाल्याने सौम्य लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले. दरम्यान यामध्ये 14 पोलीस जखमी झाले आहेत. तर 10 आंदोलक रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी 70 ते 80 जणांना ताब्यात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दगडफेकीत सात बसेस, दोन स्कॉर्पिओ आणि एक बोलेरो वाहनाचे नुकसान झाले आहे. जखमी आंदोलनकर्त्यांचा वैद्यकीय खर्च मोफत केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.









