नवारस्ता :
कोयना धरण परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कोयना भूकंप प्रशासनाच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर, वारणा खोऱ्यातील तानमळा गावाच्या पूर्वेस १० किलोमीटर अंतरावर होता. तसेच, चिपळुणाच्या दक्षिणेला सुमारे ११ किलोमीटर अंतरावर हा केंद्रबिंदू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या भूकंपाची खोली ४१ किलोमीटर इतकी नोंदली गेली आहे.
दरम्यान, कोयना धरणात सध्या ८८.६४ टीएमसी इतका पाणीसाठा असून, या भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका झालेला नाही. कोयना धरण पूर्णतः सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.







