मणेराजूरी / वार्ताहर
सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष प्रदीपकाका माने यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सावर्डे गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. गावातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन याला पाठिंबा दिला तर ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करून प्रदीप माने यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला.
तासगाव भूमिअभिलेख कार्यालयात प्रदीप माने यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज रविवारी दिनांक 20 रोजी सावर्डे गाव रोजी बंद ठेवण्यात आले. भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा सरचिटणीस यांनी नितीन पाटील यांच्या आव्हानास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदीप माने यांनी शासकीय कामात सामान्य माणसाची होत असलेली पिळवणूक आणि अडवणूक याच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणत कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले तर कार्यालयात बोगस रित्या काम करणाऱ्या उमेदवारांना खडे बोल सुनावले. त्याचा आकस मनात धरून कर्मचारी संघटनेने सरपंच प्रदिप काका माने पाटील यांचे वर खोटे गुन्हा दाखल केले आहेत. याचा निषेध व्यक्त करत सावर्डे गाव बंद ठेवण्यात आले.