पावसामुळे संभाव्य पूर बाधित झालेल्या आणि स्थलांतरित व्हावे लागलेल्या लोकांना उद्या घरी सोडण्याचा निर्णय जिल्ह्यातील पूर परिस्थिती च्या आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच उद्या पासून पावसाचा जोर ही कमी असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय ही पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गेले काही दिवस कोल्हापूर वर महापूराची सावट होते. जिल्ह्यातील सर्वच नद्यांचा पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्यासह जिल्हाप्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास सांगिण्याचा निर्णय झाला. उद्या पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
कोल्हापूर गगनबावडा रोडवरील बालिंगे पूल बंद झाल्याने लोकांच्या अनेक गैरसोयी होत आहेत. त्यामुळे अनेक तालुक्यातील दळणवळण प्रभावीत झाले आहे. त्यामुळे बालिंगे पूल आज सूरू करण्यात येईल. मात्र या पुलावर फक्त दोन चाकी तसेच हलक्या चारचाकी वाहनांची एकेरी वाहतूकच करण्यात येईल असाही निर्णय या बैठकीत घेतला गेला.
या बैठकीत बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, “पंचगंगा नदीची पाणी पातळी एक- एक इंचाने वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. उद्यापासून पावसाचा जोर कमी आल्यावर जिल्हा पुर्वरत होईल.”
पढे बोलताना ते म्हणाले, “येत्या काही दिवसात मुलांच्या परीक्षा आहेत. त्यांच्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल. मुलांच्या परिक्षेवर, अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी शासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. केवळ मुंबईसाठी नाही तर संपूर्ण राज्यात हा निर्णय लावला जाणार. मुंबईत मोठ्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे, त्यामुळे शाळांना सुट्टी दिली आहे. ” असेही ते म्हणाले.
दहशतवाद्यांच्या कोल्हापूर कनेक्शन वर भाष्य करताना ते म्हणाले, “कोल्हापूरच्या जंगलात जर कोणती दहशतवादी प्रात्यक्षिक झाले असेल तर त्यासंबंधीत माहिती घेतो. बऱ्याच वेळा अशी माहिती सेन्सेटिव्ह असते त्यामुळे बाहेर येत नाही. ” असे ही पालकमंत्री म्हणाले.
राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, “प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्याला आपला नेता मोठा व्हावा असं वाटतं असतं. त्यामुळे भावी पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे यांचे पोस्टर लागले असतील. यापुर्वी शरद पवार साहेबांनी देखील असच स्वप्न पाहिलं होतं. पण सध्या नरेंद्र मोदी यांच्या सारखा नेतृत्व करणारा माणूस नाही. 2024 साली देखील नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान होतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









