वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेत असलेल्या भारतीय बेकायदा स्थलांतरितांची परत पाठवणी करताना, या स्थलांतरीतांना दिल्या गेलेल्या वागणुकीसंबंधी चिंता भारताने अमेरिकेकडे व्यक्त केली आहे. अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी 104 भारतीयांना आपल्या वायुदलाच्या विमानाने भारतात परत पाठविले होते. मात्र, त्यांना विमानात बसविताना त्यांच्या हातांमध्ये बेड्या घालण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना साखळीने बांधले होते.
बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशांमध्ये परत पाठविण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचे समर्थन भारताने केले आहे. तथापि, त्यांना सन्मानपूर्वक पाठविण्यात यावे. त्यांना मानवी वागणूक देण्यात यावी, अशी भारताची इच्छा आहे. यासंबंधी भारताला वाटणारी चिंता अमेरिकेच्या कानावर घालण्यात आली असून यासंबंधी अमेरिकेशी चर्चा केली जात आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विक्रम मिस्री यांनी दिली आहे. भारत अमेरिकेतील सर्व बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत घ्यावयास सहमत आहे. तथापि, त्यांची परतपाठवणी करताना त्यांचा अवमान केला जाऊ नये, असे भारताचे म्हणणे आहे.
आणखी 487 लोकांची पाठवणी
अमेरिकेत बेकायदा आलेल्या आणखी 487 लोकांना भारतात परत पाठविण्यासंबंधीची सज्जता करण्यात आली आहे, असे अमेरिकेने भारताला कळविले आहे. या 487 लोकांपैकी 298 लोकांची माहिती यापूर्वीच भारताला देण्यात आली आहे, असेही प्रतिपादन विक्रम मिस्री यांनी यावेळी केले.









