आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा : सलग दुसरा पराभव : दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी हरवले : डिकॉकचे सलग दुसरे शतक
वृत्तसंस्था /लखनौ
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी पाचवेळचे वर्ल्ड चॅम्पियन बलाढ्या कांगारुंना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनौतील इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडविला. प्रारंभी, द.आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 311 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 40.5 षटकांत 177 धावांवर आटोपला. या विजयासह द.आफ्रिकेने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. वर्ल्डकपमध्ये सलग दुसरे शतक झळकावणाऱ्या डिकॉकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
टॉप ऑर्डर सपशेल फ्लॉप
312 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना 70 धावांमध्ये आफ्रिकन गोलंदाजांनी तंबूत धाडले होते. डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस यांना मोठी खेळी करता आली नाही. सर्वजण एकापाठोपाठ एक तंबूत परतले. मिचेल मार्श सात धावा काढून तंबूत परतला. वॉर्नरने 13 तर स्मिथने 19 धावांचे योगदान दिले. जोश इंग्लिसला 5 धावांवर रबाडाने तंबूत पाठवले. मॅक्सवेल 17 चेंडूमध्ये फक्त तीन धावा करु शकला. स्टोइनिस पाच धावांवर बाद झाला. दुसरीकडे लाबुशेनने 74 चेंडूमध्ये 46 धावांचे योगदान दिले. लाबुशेन आणि स्टार्क यांच्या 69 धावांच्या भागिदारीमुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ 100 धावसंख्या पार करु शकला. स्टार्कने 51 चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. स्टार्क बाद झाल्यानंतर लाबुशेनही तंबूत परतला. यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांत संपुष्टात आला. द.आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
डिकॉकचे शानदार शतक
सुरुवातीला प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. त्यांच्या सलामीवीरांनी 19 षटकात 108 धावांची सलामी दिली. सलामीवीर क्विंटन डीकॉकने 106 चेंडूंत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी शानदार खेळी साकारली. तर कर्णधार टेम्बा बवुमाने 55 चेंडूत 35 धावांची खेळी केली. बवुमा बाद झाल्यानंतर डीकॉकने रॅसी व्हॅन डर ड्युसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. ड्युसेनही 26 धावा करून तंबूत परतला. यानंतर डीकॉकने झंझावाती खेळी खेळली आणि 90 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 19 वे शतक ठरले तर या विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. डीकॉकने या आधीच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही 100 धावांची इनिंग खेळली होती. शतक झाल्यानंतर मात्र डिकॉक दुर्दैवाने बाद झाला.
मार्करमची अर्धशतकी खेळी
डिकॉक बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या एडन मार्करमने 44 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 56 धावा केल्या. मार्करमच्या अर्धशतकी खेळीमुळे आफ्रिकेने अडीचशेचा टप्पा पार केला. त्याला कमिन्सने बाद केले. यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर विशेष काही करू शकले नाहीत. क्लासेनने 29 आणि मिलरने 17 धावा केल्या तर मार्को जॅन्सेनने 26 धावांचे योगदान दिले. दमदार सुरुवातीनंतर एकवेळ दक्षिण आफ्रिकेचा संघ साडेतीनशे धावा करेल असे वाटत होते, पण एका षटकाच्या अंतराने मार्करम आणि क्लासेन बाद झाले आणि डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीने जबदरस्त गोलंदाजी केली. त्यामुळे आफ्रिकेला कमी धावसंख्येवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 311 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. जोस हॅजलवूड, पॅट कमिन्स व अॅडम झॅम्पा यांनी एकेक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 7 बाद 311 (डिकॉक 109, टेंबा बवुमा 35, ड्युसेन 26, मार्करम 56, क्लासेन 29, जॅन्सेन 26, मॅक्सवेल व मिचेल स्टार्क प्रत्येकी दोन बळी) ऑस्ट्रेलिया 40.5 षटकांत सर्वबाद 177 (मिचेल मार्श 7, डेविड वॉर्नर 13, स्टिव्ह स्मिथ 19, लाबुशेन 46, मिचेल स्टार्क 27, पॅट कमिन्स 22, रबाडा 3 तर केशव महाराज, शम्सी व जॅन्सेन प्रत्येकी दोन बळी).
डीकॉकचा डबल शतकी धमाका
आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डीकॉक यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या या मोसमातील पहिल्या सामन्यात त्याने आपल्या संघासाठी शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्यातही त्याने आपला हाच फॉर्म कायम ठेवला. वनडे विश्वचषकाच्या सलग दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावणारा डीकॉक हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी 2011 मध्ये एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी असा पराक्रम केला होता. या यादीत कुमार संगकारा व रोहित शर्माचा देखील समावेश आहे. संगकाराने 2015 वर्ल्डकपमध्ये सलग चार शतके झळकावत विक्रमी कामगिरी केली होती. त्यानंतर 2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने तीन शतके झळकावली होती. यानंतर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये डीकॉकने सलग दोन शतक झळकावत या यादीत स्थान मिळवले आहे.









