वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलंबियाने बलाढ्या ब्राझीलचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. तर या पात्र फेरीच्या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात उरूग्वेने विद्यमान विश्व करंडक विजेत्या अर्जेंटिनाचा 2-0 असा फडशा पाडला. ब्राझीलचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे.
बॅरेक्वीला येथील स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलंबियातर्फे आघाडी फळीतील लुईस डायझ याने सामन्याच्या उत्तरार्धात दोन गोल केले. या सामन्यात गॅब्रीयल मार्टिनेलीने चौथ्या मिनिटाला ब्राझीलचे खाते उघडले. कोलंबियातर्फे लुईस डायझचा खेळ दर्जेदार आणि आक्रमक झाला. कोलंबिया संघाला त्याने गोल करण्याच्या किमान दहा संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मध्यंतरापर्यंत ब्राझीलने कोलंबियावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर 75 व्या आणि 79 व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या डायझने हेडरद्वारे दोन गोल नोंदविले. ब्राझीलचा संघ आता या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे. ब्राझीलने यापूर्वी सलग दोन सामने गमविले असून ते पाचव्या स्थानावर आहेत.
अर्जेंटिना आणि उरूग्वे यांच्यातील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात उरूग्वेने बलाढ्या अर्जेंटिनाचा 2-0 असा पराभव केला. उरूग्वेतर्फे रोनॉल्ड अराजिओ आणि नूनेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयामुळे उरूग्वेचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात दहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.









