ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राजस्थानात लष्कराचे मिग-21 विमान एका घरावर कोसळलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी आहे. वैमानिक आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारल्याने ते बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या मिग-21 विमानाने सुरातगडवरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर अवघ्या 15 मिनिटांत विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटचे नियंत्रण सुटले आणि विमान हनुमानगड येथील एका घरावर कोसळले. दरम्यान, वेळीच प्रसंगावधान राखत वैमानिक आणि सहवैमानिकाने उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, एकजण जखमी आहे.
या अपघातानंतर विमानाने पेट घेतला आणि विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.









