जुनागडमध्ये कडक बंदोबस्तात दर्गा जमीनदोस्त, दोन मंदिरेही हटवली
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील जुनागडमध्ये शनिवारी मध्यरात्री उशिरा एक दर्गा बुलडोझरने पाडण्यात आला. जुनागडमधील मजवेदी गेटजवळ असलेला हा दर्गा सुमारे दोन दशके जुना होता. जुनागडमधील या दर्ग्याशिवाय दोन बेकायदेशीर मंदिरेही हटवण्यात आली आहेत. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दर्गा पाडण्याचे सुरू झालेले काम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. या कारवाईची संवेदनशीलता लक्षात घेऊन या परिसरात सुमारे 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांनी दर्ग्यापासून सुमारे 300-400 मीटर अंतरावर बॅरिकेडिंग करून संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.
जुनागडमध्ये शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पाडकाम कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. येथे अधिकारी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बुलडोझर घेऊन आले आणि त्यांनी एक दर्गा उद्ध्वस्त केला. जुनागडमधील या दर्ग्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली दोन बेकायदा मंदिरेही हटवण्यात आली आहेत.
दर्गा जमीनदोस्त केल्यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जुनागढमधील मजवेदी गेटजवळ असलेला हा दर्गा सुमारे दोन दशके जुना असल्याचे सांगितले जाते. हा दर्गा रस्त्याच्या मधोमध वसलेला होता. हा बेकायदेशीरपणे बांधलेला दर्गा हटवण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. गेल्यावषी जूनमध्येही कारवाईसाठी पोलिसांचे पथक येथे पोहोचले होते, मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर त्यांना आपले पाऊल मागे घ्यावे लागले होते.









