ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या नवीपेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ बसून जादूटोण्यासारखा अघोरी प्रकार करताना आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विश्रामबाग पोलिसांनी या दोन्ही तृतीयपंथीयांना अटक केली आहे.
लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही तृतीयपंथीयांची नावे आहेत. त्यांच्यावर नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तासाभरात शिंदे आणि धुमाळ हे चितेजवळ आले. त्यांनी सोबत काही लोकांचे फोटो, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सूया, हळद-कुंकू असे साहित्य आणले होते. त्या चितेजवळ बसून ते या साहित्याद्वारे काहीतरी अघोरी प्रकार करत होते. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने ही बाब पाहिल्यावर त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तृतीयपंथीयांना रंगेहात अटक केली.