वृत्तसंस्था/ अलूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील पश्चिम व मध्य विभाग संघाच्या उपांत्य सामन्याला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या सामन्यामध्ये भारतीय कसोटी संघातील चेतेश्वर पुजारा व पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष राहिल.
पश्चिम विभाग संघामध्ये चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि सर्फराज खान यांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चेतश्वर पुजारा हा एक अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 103 कसोटीत 7 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र अलीडकच्या कालावधीत चेतेश्वर पुजारा फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत असल्याचे दिसून येते. विश्व कसोटी
चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजारा अपयशी ठरल्याने त्याला विंडीजच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. पण पुजारा पुन्हा दर्जेदार कामगिरी करत भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाची विंडीजनंतरची पुढील कसोटी मालिका चालू वर्षअखेरीपर्यंत होणार नाही कारण या दरम्यान आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान हे या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. शॉ आणि सर्फराज खान यांनी रणजी, दुलिप आणि कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शतके झळकवली आहेत. 2018 साली झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला अजिंक्यपद मिळवून देण्यामध्ये पृथ्वी शॉचा वाट महत्त्वाचा ठरला होता. 23 वर्षीय पृथ्वी शॉने आतापर्यंत पाच कसोटी, 6 वनडे आणि एकमेव टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात शॉने 383 चेंडूत 379 धावा झळकवल्या होत्या. अलीडकेच पृथ्वी शॉने इंग्लिश क्रिकेट कौंटी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता.
सर्फराज खानने 2020-21 तसेच 2021-22 या सलग क्रिकेट हंगामात प्रथम श्रेणी समन्यात 79 धावांच्या सरासरीने 900 पेक्षा अधिक धावा जमवल्या आहेत. गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामात सर्फराज 92.66 धावांची सरासरी राखली असली तरी त्याला विंडीज दौऱ्यासाठी वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मैदानाबाहेरच्या वागणुकीमुळे तसेच तंदुरुस्तीच्या वारंवार तक्रारीमुळे तुर्तला सर्फराज खानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे हंगामी स्वरुपात बंद झाल्याचे दिसून येते. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीत सातत्य राखणाऱ्या सूर्यकुमार यादवला गेल्या फेब्रुवारीत नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात चागली कामगिरी करता आली नाही. या कसोटीत सूर्यकुमारने आपले कसोटी पदार्पण केले होते.









