ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) आणि खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Chance of mid term elections in the maharashtra start preparations Prediction of Uddhav Thackeray)
आज दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, कार्यकर्त्यांपर्यंत जा… असे आदेश दिले आहेत. दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं, आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहोचवा, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा अशी सुचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या आहेत.
मनिषा कायंदे म्हणाल्या की, शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतील जे पदाधिकारी आहेत त्यांना जे पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. त्यानुसार आजची बैठक होती. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी काही खास पॅकेज जाहीर केले आहे, यामुळे महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. कायम महाराष्ट्र – गुजरात असा वाद निर्माण करुन भाजपकडून मतांचं राजकारण केलं जात आहे, असा आरोपही कायंदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्रातील करार झालेले प्रकल्प पळवण्यात आले. नंतर सव्वा दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातीसाठी जाहीर केले. यातील अनेक प्रकल्प अगोदरच येणार होते. मात्र, दोन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही,” असेही अरविंद सावंत म्हणाले.








