वार्ताहर/गुंजी
येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मध्यान्ह आहारामध्ये विद्यार्थ्यांना भरड, अळ्dया मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण सोडून दिले होते. या घटनेचे वृत्त रविवारी ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन गुंजी शाळा केंद्राचे सीआरपी बी. ए. देसाई यांनी सोमवारी शाळेच्या आहाराची पाहणी केली. तसेच चौकशी करून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांना धारेवर धरले. खराब डाळ परत पाठवून चांगल्या डाळीचाच वापर करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून उत्तम जेवण दिले जाईल, असे आश्वासन दिले. संबंधितांकडून लेखी हमी घेऊन तो अहवाल वरिष्ठांना पाठवून दिला. अक्षरदासोह कार्यनिर्वाहक अधिकारी कसाळे यांनी मंगळवारी तातडीने गुंजी शाळेला भेट देऊन चौकशी केली असल्याचे समजते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यतप्तरतेचे कौतुक होत आहे.









