एप्रिल-मे मध्ये काम करूनही वेतन न मिळाल्याने निराशा
बेळगाव : शाळांमध्ये काम करणारे मध्यान्ह आहार कर्मचारी मागील सहा महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. एप्रिल व मे महिन्याच्या सुटीमध्ये काम करूनही त्यांना अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असून किमान डिसेंबर अखेरपूर्वी तरी हे वेतन मिळावे, अशी मागणी होत आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्याच्या सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पोषण आहार देण्यात आला. त्यामुळे उन्हाळी सुटी असतानाही मध्यान्ह आहार कर्मचारी व शिक्षक कामावर रुजू होते. शिक्षकांची दररोज नोंद होत असल्यामुळे त्यांना वेतन देण्यात आले. परंतु, मध्यान्ह आहार कर्मचारी मात्र मागील सहा महिन्यांपासून या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
10 एप्रिल ते 31 मे दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार देण्यात आला. दररोज शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आहार देण्याचे काम कर्मचाऱ्यांकडे देण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे कुपोषण होऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत माध्यान्ह आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नसल्याने कर्मचारी चिंतेत आहेत. दोन महिने सुटीतही कामावर आल्याने त्या कालावधीचे वेतन देण्याची मागणी केली जात आहे. शहरातील प्रत्येक सरकारी शाळांमध्ये मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत किमान दोन तरी कर्मचारी देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शेकडो मध्यान्ह आहार कर्मचारी कार्यरत असून त्यांना डिसेंबरअखेरपूर्वी वेतन देण्याची मागणी केली जात आहे.









