कंपनी 6,700 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक : नवीन थेट नोकऱ्या होणार उपलब्ध
नवी दिल्ली :
अमेरिकन चिप निर्मिती कंपनी मायक्रोन लवकरच भारतात आपला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार आहे. मायक्रॉनने प्रकल्पाबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी, कंपनी दोन टप्प्यांत सुमारे 6,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा भारतातील पहिला प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार असल्याचे कंपनीने म्हटले असून तो वर्ष 2024 च्या अखेरीस कार्यान्वित होणार असल्याचेही सांगितले आहे.
गुंतवणूक 2.75 अब्ज डॉलर्स
मायक्रोनकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये नवीन सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी प्रकल्प उभारणार आहेत. केंद्र सरकार आणि गुजरात राज्य सरकारच्या मदतीने या प्रकल्पामधील एकूण गुंतवणूक 2.75 अब्ज डॉलर (सुमारे 22,540 कोटी रुपये) राहणार आहे.
सरकारच्या असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग योजनेअंतर्गत मायक्रोनच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत, मायक्रोनला केंद्र सरकारकडून एकूण प्रकल्प खर्चासाठी 50 टक्के आणि गुजरात राज्याकडून एकूण प्रकल्प खर्चासाठी 20 टक्के प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य मिळेल.
5,000 नवीन थेट नोकऱ्या
प्रकल्पाचा पहिला टप्पा 2024 च्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित आहे. दुसरा टप्पा दशकाच्या दुसऱ्या भागात सुरू होणे अपेक्षित आहे. कंपनीने सांगितले की पुढील काही वर्षांत 5,000 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे.









