उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांच्याहस्ते १६ रोजी वितरण
ओटवणे प्रतिनिधी
कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान २०२३ माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बांबुशेती तज्ञ मायकल डिसोजा यांना जाहीर झाला आहे. या कोकण आयडॉल सन्मानाचे वितरण रविवारी १६ जुलै रोजी दादर पूर्व येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या बी एन वैद्य सभागृहात होणाऱ्या कोकण व्हीजन २०३० परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आणि या समृद्ध कोकण चळवळीतील या चारही संस्थांच्या २३ साव्या वर्धापन दिनानिमित्त कोकणात विविध क्षेत्रात क्रांतिकारी काम करणाऱ्या उद्योजकांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कोकणातील असामान्य ७५ व्यक्तिमत्त्वांना एकाच वेळी एकाच व्यासपीठावर भेटण्याची आणि असामान्य काम करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांचे असामान्य अनुभव समजुन घेण्याची संधी कोकण आयडॉल परिषदेच्या निमित्ताने सर्वांनाच उपलब्ध होणार आहे.
ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या पिकातून आर्थिक विकासाची क्रांती झाली तिच क्षमता कोकणामध्ये बांबू या पिकामध्ये आहे. कोकण विकासाला दिशा देणाऱ्या या पिकाची व्यवसायिक तत्वावर प्रगतशील बागायतदार फ्रान्सिस डिसोझा यांनी सुरवात केल्यानंतर त्यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा या दोघांनीही सुमारे ४० एकरवर दहा हजार बांबूच्या बेटांची लागवड केली. या कुटुंबाने शास्त्रशुद्ध पद्धतीने कोकणातील एक बांबू शेतीचे आदर्श मॉडेल निर्माण केले. सोन्याची काठी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या बांबूची शेतीतील मायकल डिसोजा यांचे योगदान लक्षात घेऊन कोकणातून बांबू शेती तज्ञ म्हणून कोकण आयडॉल सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.









