सनरायजर्स हैदराबादचा 8 गड्यांनी पराभव, मधवालचे चार बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील रविवारी येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या साखळी फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात कॅमेरुन ग्रीनचे दमदार नाबाद शतक तसेच कर्णधार शर्माचे अर्धशतक आणि मधवालच्या चार बळींच्या जोरावर यजमान मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा 12 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला नितांत विजयाची गरज होती. मात्र, हैदराबादच्या मयांक अगरवाल आणि विवरंत शर्मा यांची अर्धशतके वाया गेली. मुंबई इंडियन्सच्या कॅमेरुन ग्रीनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. 2023 च्या आयपीएल स्पर्धेत शतक नेंदवणारा ग्रीन हा नववा फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. हैदराबादची सलामीची जोडी विवरंत शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी संघाच्या डावाला दमदार सुरुवात करून देताना 13.5 षटकात 140 धावांची शतकी भागीदारी केली. हैदराबाद संघाने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 53 धावा जमवल्या. हैदराबादचे पहिले अर्धशतक 36 चेंडूत फलकावर लागले. शर्मा आणि अगरवाल यांची अर्धशतकी भागीदारी 36 चेंडूत नोंदवली. शर्माने आपले अर्धशतक 36 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने झळकवले. हैदराबादचे शतक 66 चेंडूत झळकले. अगरवाल यांनी शर्मा या सलामीच्या जोडीची शतकी भागीदारी 66 चेंडूतच नोंदवली गेली. अगरवालने 32 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. हैदराबादचे शतक 87 चेंडूत तर 200 धावा 121 चेंडूत नोंदवल्या गेल्या.

डावातील 14 व्या षटकात मुंबईच्या मधवालने शर्माला झेलबाद केले. त्यानंतर मधवालने अगरवालला इशान किसनकडे झेल देण्यास भाग पाडले. शर्माने 47 चेंडूत 2 षटकार आणि आणि 9 चौकारासह 69 तर अगरवालने 46 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारासह 83 धावा झळकवल्या. हैदराबादने षटकामागे 10 धावांची सरासरी राखली होती. क्लासनने 13 चेंडूत 2 चौकारासह 18 धावा जमवल्या. जॉर्डनच्या गोलंदाजीवर फिलिप्स एका धावेवर त्रिफळाचित झाला. तर मधवालने क्लासनचा त्रिफळा उडवला. 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मधवालने ब्रुकला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचित केले. मधवालचा हा चौथा बळी ठरला. हैदराबादच्या डावामध्ये 7 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. मुंबई संघातर्फे आकाश मधवालने 37 धावात 4 तर जॉर्डनने 42 धावात एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या डावाला इशान किसन आणि कर्णधार शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली पण तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने इशान किसनला ब्रुककरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमवल्या. यानंतर मात्र हैदराबादच्या गोलंदाजीची कॅमेरुन ग्रीन आणि रोहित शर्मा यांनी धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची भागीदारी केली. डावातील 14 व्या षटकात डागरने रोहित शर्माला रे•ाrकरवी झेलबाद केले. त्याने 37 चेंडुत 1 षटकार आणि 8 चौकारासह 56 धावा झळकवल्या.
मुंबई इंडियन्सने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 60 धावा जमवताना एक गडी गमवला. मुंबईचे पहिले अर्धशतक 33 चेंडूत नोदवले गेले. ग्रीन आणि शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 25 चेंडूत झळकविले. तर ग्रीनने आपले अर्धशतक 5 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 20 चेंडूत नोंदवले. मुंबई इंडियन्सचे शतक 56 चेंडूत फलकावर लागले. शर्मा आणि ग्रीन यांनी दुसऱ्या गड्यासाठीची शतकी भागीदारी 50 चेंडूत नोंदवली. शर्माने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 31 चेंडूत झळकवले. मुंबई इंडियन्सच्या 150 धावात 83 चेंडूत नोंदवल्या गेल्या. तर ग्रीन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागीदारी 26 चेंडूत पूर्ण केली. मुंबई इंडियन्सच्या 200 धावा 110 चेंडूत फलकावर लागल्या. कॅमेरुन ग्रीनने डावातील 18 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. त्याने 47 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 100 धावा झळकवल्या. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 25 धावा केल्या. मुंबईच्या डावात 10 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले. त्यांना अवांतराच्या रुपात 6 धावा मिळाल्या. भुवनेश्वर कुमार आणि मयांक डागर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या स्पर्धेत साखळी फेरीअखेर मुंबई इंडियन्सने 14 सामन्यातून 8 विजयासह 16 गुण नोंदवले आहेत. त्यांनी -0.044 रनरेट राखला आहे. तर हैदराबाद सनरायजर्स संघाने 14 सामन्यातून 8 गुणासह शेवटचे स्थान मिळवले.
संक्षिप्त धावफलक : सनरायजर्स हैदराबाद 20 षटकात 5 बाद 200 (विवरंत शर्मा 47 चेंडूत 69, मयांक अगरवाल 46 चेंडूत 83, क्लासन 13 चेंडूत 18, मारक्रेम 7 चेंडूत नाबाद 13, सनवीर सिंग नाबाद 4, फिलिप्स 1, ब्रुक 0, अवांतर 12, मधवाल 4-37, जॉर्डन 1-42),
मुंबई इंडियन्स 18 षटकात 2 बाद 201 (इशान किसन 12 चेंडुत 14, रोहित शर्मा 37 चेंडूत 56, कॅमेरुन ग्रीन 47 चेंडूत नाबाद 100, सूर्यकुमार यादव 16 चेंडूत नाबाद 25, अवांतर 6, भुवनेश्वर कुमार 1-26, डागर 1-37).









