सनरायजर्स हैदराबादचा 14 धावांनी पराभव, ग्रीनचे नाबाद अर्धशतक, टिम डेव्हिडचे चार झेल
वृत्तसंस्था/ हैदराबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यजमान हैदराबाद सनरायजर्सचा एक चेंडू बाकी ठेवून 14 धावांनी पराभव करत आपला सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सने सहा गुणासह सहावे स्थान तर सनरायजर्स हैदराबादला 4 गुणासह नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 बाद 192 धावा जमवल्या. मुंबई संघातील कॅमेरॉन ग्रीनने आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक झळकविले. तसेच इशान किशन, तिलक वर्मा आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी समयोचित फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना सनरायजर्स हैदराबादचा डाव 19.5 षटकात 178 धावात आटोपला.
हैदराबादच्या डावामध्ये मयांक अगरवालने 41 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 48, कर्णधार मार्करमने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 22, क्लासेनने 16 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 36, जान्सेनने 3 चौकारासह 13, वॉशिंग्टन सुंदरने 2 चौकारासह 10 धावा जमवल्या. सलामीचा ब्रुक 2 चौकारासह 9 धावा काढून लवकर बाद झाला. राहुल त्रिपाठी 7 धावा जमवत बाद झाला. अगरवाल आणि मार्करम यांनी तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. अगरवालने क्लासेनसमवेत पाचव्या गड्यासाठी 55 धावांची भर घातली. सनरायजर्स हैदराबाद संघातील शेवटचे षटक अर्जुन तेंडुलकरने टाकले. या षटकात त्याने केवळ 4 धावा दिल्या. तर त्याच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार रोहित शर्माकरवी झेलबाद झाल्यानंतर सनरायजर्सचा डाव 178 धावांत संपुष्टात आला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरचा हा दुसरा सामना असून त्याने आपला पहिला बळी या सामन्यात नोंदवला आहे. हैदराबाद संघातर्फे 4 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे बेहरेनडॉर्फ, पीयूष चावला, मेरेडिथ यांनी प्रत्येकी दोन तर अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरॉनन ग्रीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हैदराबादच्या डावामध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी 13 वाईड चेंडूसह एकूण 19 अवांतर धावा दिल्या.
मुंबईची चांगली सुरुवात
तत्पूर्वी, या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने 28 चेंडूत 41 धावांची भागीदारी केली. नटराजनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा मार्करमकरवी झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 6 चौकारासह 28 धावा जमवल्या. कर्णधार शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कॅमेरॉन ग्रीन आणि इशान किशन या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 5.3 षटकात 46 धावांची भर घातली. मार्को जान्सेनने इशान किशनला मार्करकरवी झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 38 धावा जमवल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला सूर्यकुमार यादव लवकर बाद झाला. जान्सेनच्या गोलंदाजीवर मार्करमने सूर्यकुमार यादवचा अप्रतिम झेल घेतला. त्याने 3 चेंडूत 1 षटकारासह 7 धावा जमवल्या. मार्करमने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवताना तीन अप्रतिम झेल टिपले. 11.5 षटकात मुंबईने 3 बाद 95 धावापर्यंत मजल मारली होती.
वर्मा, ग्रीनची फटकेबाजी

ग्रीन आणि फलंदाजीत सातत्य राखणाऱ्या तिलक वर्मा या जोडीने मुंबईला सुस्थितीत नेताना चौथ्या गड्यासाठी 28 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमारने तिलक वर्माला झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारासह 37 धावा तडकावल्या. टीम डेव्हिड डावातील शेवटच्या चेंडूवर धावचित झाला. त्याने 11 चेंडूत 2 चौकारासह 16 धावा जमवल्या. ग्रीनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहात 40 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह नाबाद 64 धावा जमवल्या. मुंबईच्या डावात 9 षटकार आणि 19 चौकार नोंदवले गेले. सनरायजर्स हैदराबादतर्फे मार्को जान्सेनने 2 तर भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात मधल्या षटकामध्ये मुंबईच्या फलंदाजांना धावा घेणे कठीण जात होते पण तिलक वर्माची फलंदाजी याला अपवाद ठरली. हैदराबाद संघातील मार्को जान्सेनच्या षटकात (डावातील 15 वे षटक) तिलक वर्माने सलग 2 षटकार खेचत 21 धावा घेतल्या. तसेच त्यानंतर पुढील षटकात तिलक वर्माने मार्कंडेच्या गोलंदाजीवर आकर्षक चौकार व स्वीपचा षटकार ठोकला. मार्कंडेच्या या षटकात मुंबईने 14 धावा घेतल्या. त्याचप्रमाणे नटराजनच्या एका षटकामध्ये ग्रीनने सलग तीन चौकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. हैदराबादतर्फे नटराजन हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. मुंबईच्या डावातील शेवटचे षटक नटराजनने टाकले होते. त्याने या सामन्यात 4 षटकात 50 धावा दिल्या तर मुंबई संघाने शेवटच्या 5 षटकात 52 धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकात 5 बाद 192 (रोहित शर्मा 28, इशान किशन 38, कॅमेरॉन ग्रीन नाबाद 64, सूर्यकुमार यादव 7, तिलक वर्मा 37, टीम डेविड 16, अवांतर 2, मार्को जान्सेन 2-43, भुवनेश्वर कुमार 1-31, टी. नटराजन 1-50).
सनरायजर्स हैदराबाद 19.5 षटकात सर्वबाद 178 (ब्रुक 9, मयांक अगरवाल 48, राहुल त्रिपाठी 7, एडन मार्करम 22, क्लासेन 36, अभिषेक शर्मा 1, अब्दुल समद 9, मार्को जान्सेन 13, वॉशिंग्टन सुंदर 10, भुवनेश्वर कुमार 2, मार्कंडे नाबाद 2, अवांतर 19, बेहरेनडॉर्फ 2-37, मेरेडिथ 2-33, चावला 2-43, अर्जुन तेंडुलकर 1-18, ग्रीन 1-29).








