करनचे अर्धशतक, अर्शदीपचे चार बळी, सूर्यकुमार-ग्रीन यांची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगच्या शेवटच्या षटकातील भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी पराभव केला. ग्रीन तसेच सूर्यकुमार यादव यांनी नोंदवलेली अर्धशतके वाया गेली. वानखेडेच्या स्टेडियमवर शनिवारी षटकार आणि चौकारांची आतषबाजी झाल्याने प्रेक्षक बेहद्द खूष झाले.
शेवटच्या चार षटकातील तुफान फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने यजमान मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले. पंजाब किंग्जने 20 षटकात 8 बाद 214 धावा जमवल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 201 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सने आता 6 सामन्यातून 6 गुण मिळवले आहेत. तर पंजाब किंग्जने 7 सामन्यातून 4 विजयासाह 8 गुण घेतले आहेत.
कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किसन या सलामीच्या जोडीने मुंबईच्या डावाला सुरुवात केली पण दुसऱ्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने इशान किसनला एका धावेवर झेलबाद केले. कर्णधार शर्माला ग्रीनकडून चांगली साथ मिळाली आणि या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 8.2 षटकात 76 धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोनने स्वत:च्याच गोलंदाजीवर रोहित शर्माला टिपले. त्याने 27 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 44 धावा जमवल्या. शर्मा बाद झाल्यानंतर कॅमेरुन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 9 षटकात 75 धावा झळकवल्या. 15.3 षटकात मुंबईने 3 बाद 159 धावा जमवल्या होत्या. इलिसने ग्रीनला करन करवी झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारासह 67 धावा जमवल्या. ग्रीन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने फलंदाजीची सूत्रे स्वत:कडे घेतली आणि या स्पर्धेत त्याने आपले पहिले अर्धशतक झळकविले. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा मुंबईचा कर्दनकाळ ठरला. अर्शदीपने सूर्यकुमार यादवला तायडेकरवी झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारासह 57 धावा जमवल्या. यादव बाद झाल्या त्यावेळी मुंबईला विजयासाठी 33 धावांची जरुरी होती. मुंबई इंडियन्सचे द्विशतक 19.3 षटकात फलकावर लागले. अर्शदीप सिंगचे शेवटचे षटक निर्णायक ठरले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माच्या यष्ट्या उखडल्या. त्याने 3 धावा जमवल्या. अर्शदीप सिंगने या षटकातील चौथ्या चेंडूवर वधेराचा त्रिफळा उडवला. आर्चरने पुढील चेंडू खेळून काढत अर्शदीपची संभाव्य हॅट्ट्रिक थोपवली. टीम डेविडने 13 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 25 तर आर्चरने नाबाद 1 धाव जमवली. मुंबई इंडियन्सला अवांतराच्या रुपात 3 धावा मिळाल्या. पंजाबतर्फे अर्शदीप सिंगने 29 धावात 4 तर नाथन इलिस आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. मुंबईच्या डावात 11 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. मुंबई संघाने पॉवरप्ले दरम्यान 54 धावांत 1 बळी गमवला होता.
तत्पुर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. पंजाबने पॉवर प्ले दरम्यान 58 धावा जमवताना एक गडी गमवला. मॅथ्यू शॉर्ट आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने सावध फलंदाजी केली. मात्र तिसऱ्या षटकातच मुंबईच्या ग्रीनने शॉर्टला चावला करवी झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 2 चौकारासह 11 धावा केल्या. पीयुष चावलाने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तायडेने प्रभसिमरन सिंगसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली. अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला पायचित केले. या स्पर्धेतील अर्जुनचा हा दुसरा बळी ठरला. प्रभसिमरन सिंगने 17 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा जमवल्या. पीयुष चावलाने लिव्हिंगस्टोनला यष्टीरक्षककरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकारासह 10 धावा केल्या. चावलाने आपल्या याच षटकातील चौथ्या चेंडूवर तायडेचा त्रिफळा उडवला. त्याने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 29 धावा जमवल्या. पंजाबची स्थिती यावेळी 4 बाद 86 अशी होती.
हरप्रित सिंग आणि कर्णधार सॅम करन यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर यथेच्छ फटकेबाजी केल्याने पंजाबला या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. पंजाबच्या या जोडीने पाचव्या गड्यासाठी 8 षटकात 92 धावांची भागीदारी केली. डावातील 18 व्या षटकात हरप्रित सिंग ग्रीनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 28 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 41 धावा जमवल्या. आर्चरने स्वत:च्याच गोलंदाजीवर सॅम करनला टिपले. त्याने 29 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारासह 55 धावा झळकवल्या. करन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जितेश शर्माने केवळ 7 चेंडूत 4 षटकारासह 25 धावा झोडपल्या आणि तो बेरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. डावातील शेवटच्या षटकात बेरेनडॉर्फने चौथ्या चेंडूवर हा बळी मिळवला. त्यानंतर डावातील शेवटच्या चेंडूवर हरप्रित ब्रार 5 धावावर धावचित झाला. पंजाब किंग्जच्या डावामध्ये अर्जुन तेंडुलकरच्या एका षटकात पंजाबच्या फलंदाजांनी 31 धावा झोडपल्या. तर ग्रीनच्या एका षटकात पंजाबच्या फलंदाजांनी 4 षटकार खेचले. पंजाब किंग्जला 12 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 7 वाईड आणि 2 नोबॉल यांचा समावेश आहे. पंजाबच्या डावामध्ये 14 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. मुंबईतर्फे ग्रीनने 41 धावात 2, चावलाने 15 धावात 2 तर बेरेनडॉर्फ, तेंडुलकर आणि आर्चर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्ज 20 षटकात 8 बाद 214 (शॉर्ट 11, प्रभसिमरन सिंग 26, अथर्व तायडे 29, लिव्हिंगस्टोन 10, हरप्रित सिंग 41, सॅम करन 55, जितेश शर्मा 25, हरप्रित ब्रार 5, अवांतर 12, ग्रीन 2-41, चावला 2-15, तेंडुलकर 1-48, बेरेनडॉर्फ 1-41, आर्चर 1-42).
मुंबई इंडियन्स 20 षटकात 6 बाद 201 (रोहित शर्मा 44, इशान किसन 1, कॅमेरुन ग्रीन 67, सूर्यकुमार यादव 57, टीम डेविड नाबाद 25, तिलक वर्मा 3, वधेरा 0, आर्चर नाबाद 1, अवांतर 3, अर्शदीप सिंग 4-29, इलिस 1-44, लिव्हिंगस्टोन 1-23).