सूर्यकुमार यादवचे नाबाद शतक : रशिद खानची अष्टपैलू खेळी वाया
वृत्तसंस्था/ मुंबई
सूर्यकुमार यादवच्या वादळी नाबाद शतकाच्या जोरावर शुक्रवारी येथील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्सने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव करत बाद फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात गुजरात संघातील अष्टपैलू रशीद खानची अष्टपैलू खेळी मात्र वाया गेली. त्याने या सामन्यात गोलंदाजीत 30 धावात 4 तर फलंदाजीत 32 चेंडूत 10 उत्तुंग षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 79 धावा झळकविल्या. स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सने 12 सामन्यातून 14 गुणासह तिसरे स्थान मिळविले आहे पण हा सामना गमवूनही विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने आपले आघाडीचे स्थान कायम राखताना 12 सामन्यातून 16 गुण नोंदवले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या अचूक गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सचे पहिले पाच फलंदाज केवळ 55 धावात तंबूत परतले होते. सलामीच्या साहाने 5 चेंडूत 2, गिलने 9 चेंडूत 6, कर्णधार हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 4 धावा जमवल्या. विजय शंकरने 14 चेंडूत 6 चौकारांसह 29 तर डेव्हिड मिलरने 26 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 41 धावा जमवल्या. अभिनव मनोहर 2 धावावर बाद झाला. तर राहुल तेवातियाने 13 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा केल्या. त्यानंतर नूर अहमद एका धावेवर बाद झाला. गुजरातची यावेळी स्थिती 13.2 षटकात 8 बाद 103 अशी होती. त्यानंतर अष्टपैलू रशीद खानने जोसेफला साथीला घेत आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 32 चेंडूत 10 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 79 धावा फटकावल्या. या जोडीने नवव्या गड्यासाठी अभेद्य 88 धावांची भागीदारी केली. पण त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. रशीद खानची टी-20 प्रकारातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 48 धावात 3 गडी गमवले. रशीद खानने 21 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह जलद अर्धशतक झळकविले. गुजरातच्या डावात 12 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. मुंबईतर्फे आकाश मधवालने 3 तर पियुष चावला व कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 तसेच बेरेनडॉर्फने एक गडी बाद केला.
तत्पुर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 219 धावांचे दमदार आव्हान दिले. या स्पर्धेतील हा 57 वा सामना असून सूर्यकुमार यादवने केवळ 49 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 103 धावा झोडपल्या. गुजरात टायटन्सच्या रशिद खानने 30 धावात 4 गडी बाद केले.
या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या दृष्टीकोनातून हा महत्त्वाचा सामना आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 37 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. मुंबई इंडियन्सचे पहिले अर्धशतक 29 चेंडूत फलकावर लागले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांमध्ये मुंबईने एकही गडी न गमविताना 61 धावा जमविल्या. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले दरम्यान एकही गडी न गमाविण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच प्रमाणे वानखेडे स्टेडियमवर 2011 नंतर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने पहिलेच शतक नोंदविले आहे.
अफगाणच्या रशिद खानने आपल्या फिरकी गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सच्या इशान किसन आणि रोहित शर्मा यांना एकाच षटकात बाद केले. डावातील 7 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर रशिद खानने कर्णधार शर्माला तेवातियाकरवी झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. रशिद खानने या षटकातील 5 व्या चेंडूवर इशान किसनला पायचीत केले. त्याने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. डावतील 9 व्या षटकात मुंबई इंडियन्सने तिसरा गडी गमाविला. रशिद खानने नेहल वधेराचा त्रिफळा उडविला. त्याने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. एका बाजूने सूर्यकुमार यादव आक्रमक आणि उत्तुंग फटके मारत होता. मुंबईचे शतक 66 चेंडूत फलकावर लागले.
सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद या जोडीने चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी 7 षटकात नोंदविली. मुंबईच्या 150 धावा 89 चेंडूत नोंदविल्या गेल्या. यादव आणि विष्णू विनोद या जोडीने चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 28 चेंडूत झळकविली. सूर्यकुमार यादवने 32 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकविले. दरम्यान 16 व्या षटकात मोहित शर्माने विष्णू विनोदला मनोहरकरवी झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सचा टीम डेव्हिड पुन्हा अधिक धावा जमवू शकला नाही. रशिद खानने आपल्या शेवटच्या षटकातील चेंडूवर डेव्हिडला टिपले. त्याने 3 चेंडूत 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सचे द्विशतक 114 चेंडूत फलकावर लागले. सूर्यकुमार यादवने केवळ 49 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांसह आपले शतक शेवटच्या षटकात झळकविले. तसेच त्याने ग्रीन समवेत सहाव्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी केवळ 18 चेंडूत केली. या भागिदारीमध्ये यादवचा वाटा 50 तर ग्रीनचा 3 धावांचा होता. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सूर्यकुमार यादवचे हे पहिले शतक आहे. मुंबई इंडियन्सच्या डावात 12 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सला अवांतराच्या रुपात 2 धावा मिळाल्या. गुजरात टायटन्सतर्फे रशिद खानने 30 धावात 4 तर मोहित शर्माने 43 धावात 1 गडी बाद केला. या सामन्यात गुजरातचा मोहम्मद शमी प्रभावी ठरु शकला नाही. त्याने 4 षटकात 53 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक – मुंबई इंडियन्स : 20 षटकात 5 बाद 218 (इशान किसन 20 चेंडूत 31, रोहित शर्मा 18 चेंडूत 29, सूर्यकुमार यादव 49 चेंडूत नाबाद 103, वधेरा 7 चेंडूत 15, विष्णू विनोद 20 चेंडूत 30, डेव्हिड 3 चेंडूत 5, ग्रीन 3 चेंडूत नाबाद 3 धावा, अवांतर 2, रशिद खान 4-30, मोहित शर्मा 1-43).
गुजरात टायटन्स 20 षटकात 8 बाद 191 (साहा 2, गिल 6, पांड्या 4, विजय शंकर 14 चेंडूत 29, डेव्हिड मिलर 26 चेंडूत 41, अभिनव 2, तेवातिया 13 चेंडूत 14, रशीद खान 32 चेंडूत 10 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 79, नूर अहमद 1, अल्झार जोसेफ नाबाद 7, अवांतर 6, आकाश मधवाल 3-31, पियुष चावला 2-36, कार्तिकेय 2-37, बेरेनडॉर्फ 1-37).