केंद्र सरकारची तिन्ही सेनादलांना सूचना, सज्जता करण्याचा आदेश
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी गणतंत्रदिनी ‘कर्तव्यपथा’वरील संचलनात केवळ महिला सैनिकांचाच समावेश राहणार आहे. संरक्षण विभागाने तशी सूचना तिन्ही सेनादलांना दिली असून त्यादृष्टीने सज्जता करण्याचा आदेश दिला आहे. संचलनाप्रमाणेच चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही केवळ महिलांचाच सहभाग असेल.
2024 चा गणतंत्रदिन दिल्लीत अशाप्रकारे साजरा करण्याची योजना केंद्र सरकारने सज्ज केली आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने सैन्यदलांमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी गणतंत्रदिनी कर्तव्यपथावर सेनादलांमधील ‘महिलाराज’ आपल्याला पहावयास मिळणार आहे. गणतंत्रदिनी महिलांचा समभाग वाढविण्याचा निर्णय 7 फेब्रुवारी 2023 या दिवशी घेण्यात आला होता. संरक्षण विभागाचे सचिव गिरीधर अरमाने यांच्या अध्यक्षतेत एक बैठक झाली होती. त्यात या निर्णयावर विचार करुन तो घेण्यात आला होता. इतर संबंधित विभागांचे सचिवही या बैठकीत समाविष्ट झाले होते. 2024 मध्ये कर्तव्यपथावर संचलन, बँडवादन, चित्ररथ आणि अन्य कार्यक्रमात केवळ महिलांचा सहभाग असावा हा प्रस्ताव या बैठकीत संमत करण्यात आला होता. आता त्याचे क्रियान्वयन होणार आहे.
2023 च्या गणतंत्रदिनीही केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांच्या चित्ररथांमध्ये ‘नारीशक्ती’ हीच संकल्पना निर्धारित करण्यात आली होती. तसेच इतिहासात प्रथमच नौसेनेच्या 144 नौसैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांनी केले होते. आता आगामी गणतंत्रदिनी त्या पुढची पायरी गाठली जाणार असून महिलांचाच सहभाग राहणार आहे.









