म्हसवड :
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या मटका, दारु या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नव्याने आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कंबर कसली असून पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांनी घातलेला धुमाकूळ मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पावले उचलत दारू विक्री, जुगार, आणि मटका यावर कारवाई करून तब्बल एका रात्रीत 6 गुन्हे दाखल करत 12 आरोपींवर कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून पुढची कारवाई कोणावर होणार याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.
सोमवारी अचानक मटका, जुगार, आणि ढाब्यावर दारू विक्री करणाऱ्यांना म्हसवड पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवत कारवाईचा बडगा उगारुन अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याची ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
म्हसवड हद्दीतील हिंगणी, विरळी, मासाळवाडी आणि ढाकणी भागात पोलिसांनी छापे टाकून मोठी मोहीम राबवली. दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेताना तसेच विरळी येथे जुगार पत्ते खेळताना काही जणांना रंगेहात पकडले. तसेच, मोदी आणि जयमल्हार धाब्याजवळ दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, मटका खेळणाऱ्यांसोबत मटका मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार देवानंद खाडे, भगवान सजगणे, शशिकांत खाडे, रुपाली फडतरे, निता पळे, मैना हांगे, अमर नारनवर, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, विकास ओंबासे, युवराज खाडे, राहुल थोरात आदीनी सहभाग घेतला होता.
- कारवाईचे सातत्य सुरूच ठेवणार
म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाड्या वस्तीवर अवैध धंदे सुरू आहेत त्यावर कारवाईचा बडगा यापुढे असाच उगारुन म्हसवडमधील अवैध धंद्यांची साखळी तोडण्यासाठी आणखी कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देत अवैध धंदे बंद नाही झाले, तर पुढची कारवाई आणखी गंभीर असेल!, असा इशारा म्हसवडचे सपोनि सोनवणे यांनी दिला आहे.








