म्हासुर्ली / वार्ताहर
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धामणी खोऱ्यातील एकमेव पाणी साठवण प्रकल्प असलेला म्हासुर्ली – झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्णपणे क्षमतेने भरला असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मुख्य दरवाजातून सुरू करण्यात आला आहे.
झापाचीवाडी प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळ सोसणाऱ्या म्हासुर्ली परिसराच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प पूर्ण झाला असून ९९० स.घ.मि साठवण क्षमता आणि सुमारे शंभर हेक्टर भीज क्षेत्र असलेला हा प्रकल्प गतवर्षी पावसाळ्यापूर्वी किरकोळ कामे वगळता पूर्ण झाला होता.दरम्यान मार्च महिन्यामध्ये दगडी अस्तरीकरणसह इतर कामे अपूर्ण असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी पूर्णपणे सोडून देऊन उन्हाळ्यामध्ये उर्वरित कामे पूर्ण केली होती.
गेल्या चार दिवसातील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग प्रकल्पाच्या मुख्य दरवाजातून सुरू करण्यात आला आहे.









