नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांचा आरोप : नगराध्यक्षांकडून म्हादई विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलाविण्याची सूचना
म्हापसा : म्हादईचे कर्नाटकमध्ये वळविण्यासंदर्भात डीपीआर मागे घेण्याचा तसेच म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करावे, असा ठराव राज्यात सर्वच पंचायतींकडून ठराव घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पालिकेच्या बैठकीत नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी सदर डीपीआर रद्द करण्याबाबत ठराव मांडला. मात्र यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी डीपीआर म्हणजे काय हे माहीत नसल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या पालिकेत बाजूला बसलेल्या त्यांच्या मार्गदर्शकांनी डीपीआरची माहिती देत बैठकीत प्रॉम्टिंग केले. त्यानंतर त्या विषयी खास बैठक बोलावण्यात येईल, असे नगराध्यांनी सांगितले. नगराध्यक्षांनी याबाबत कोणतेही कारण न देता बैठक कार्यक्रम पत्रिकेवर घेऊया, असे सांगून चर्चा करणे टाळले. यावेळी उपनगराध्यक्ष विराज फडके, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, पालिका अभियंता नार्वेकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. याप्रकरणाचा नगरसेवक अॅड. शंशांक नार्वेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. एकीकडे सरकार म्हादईसाठी लोकचळवळ उभारा असे सांगते, परंतु दुसरीकडे भाजपाप्रणित म्हापसा पालिका मंडळ याकडे दुर्लक्ष करते, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या या दुटप्पी धोरणावर बैठकीत जोरदार टीका केली. बैठकीत नगरसेवक अॅड. शंशांक नार्वेकरांनी म्हादईसंदर्भात वरील प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून गोव्यातील अनेक पंचायतींनी याआधीच म्हादई वाचविण्यासाठी ठराव मंजूर केलेत. त्यामुळे म्हापसा पालिकेने देखील तसा ठराव घ्यावा व चळवळीत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. मुळात नगरसेवक अॅड. शंशांक नार्वेकर हे विरोधी गटातील नगरसेवक. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर चर्चा हेतुपुरस्सर टाळल्याचे असल्याचे एकंदरीत दिसून आले.
इतर विकासकामांबाबत चर्चा
या बैठकीत म्हापसा शहरातील मुख्य उद्यानांचे सौंदर्यीकरण व देखरेखीची जबाबदरी ही सीएसआर अंतर्गत खासगी कंपनीकडे देण्याचे ठरले. याविषयी पालिकेकडून आपल्या अटी व नियम नमूद करून हा प्रस्ताव संबंधित खासगी कंपनीस पाठविला जाणार, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. या उद्यानांत कोर्टजवळील उद्यान, कोर्ट जंक्शनवरील दुभाजक, ऊही पार्क, कोर्ट जंक्शनवरील क्लॉक टॉवर, चाचा नेहऊ पार्क, राममनोहर लोहिया उद्यान आदींचा यात समावेश आहे. यात नगरसेविका कमल डिसोझा, शुभांगी वायंगणकर, अन्वी कोरगावकर, तारक आरोलकर, साईनाथ राऊळ, प्रकाश भिवशेट, सुधीर कांदोळकर, डॉ. नूतन बिचोलकर आदींनी भाग घेतला.
म्हादई संदर्भात खास बैठक घेणे योग्य : नगराध्यक्षा प्रिया मिशाळ
दरम्यान याबाबत पत्रकारांना माहिती देताना नगराध्यक्षा प्रिया मिशाळ म्हणाल्या, या संवेदनशील विषयाची आम्हाला जाणीव आहे. हा विषय इतर कोणत्याही विषयांसोबत घेता व आता चर्चा करण्यापेक्षा म्हादईसंदर्भात एक विशेष पालिका बैठक बोलावूया. ते अधिक योग्य ठरेल. हा खास विषय कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) घेऊन यावर विचार विनियम कऊया. यासाठी आपण आजच्या बैठकीतील चर्चा टाळली, असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मात्र हे कोणी सूचविले असे नगराध्यक्षांना पत्रकारांनी विचारले असता यावर त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.
नगराध्यक्षांचे डीपीआरबाबत अज्ञान : अॅड. शशांक नार्वेकर
आपण म्हादईसंदर्भात ठराव मांडल्यानंतर नगराध्यक्ष त्याबाबत काहीच बोलण्यास तयार नव्हत्या. मुळात डीपीआर म्हणजे काय हे नगराध्यक्षांना माहीत नाही, दुर्दैव म्हणावे लागेल. बैठकीत नगराध्यक्षच आपल्यालाच विचारतात डीपीआर म्हणजे काय?, नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी सांगितले.









