यंदाही प्लास्टिकमुक्त करण्याचा पालिका मंडळ, कार्यकारिणीचा निर्णय
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापश्यातील प्रसिद्ध असलेला श्री देव बोडगेश्वर देवाची जत्रा येत्या दि 5 जानेवारी रोजी होणार असून ही जत्रा यंदाही प्लास्टिक मुक्त करण्याचा आणि भेळपुरी, गोबीमंचुरी यांच्यावर नियंत्रण ठेऊन, वाहतुकीची कोंडी न होण्यासाठी व्यवस्था करणे, दुकानदारांना एका राकेत दुकाने मोजमाप करून देण्याचा निर्णय नगराधक्षा शुभांगी वायंगणकर व पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्या उपस्थित देवस्थानच्या पदाधिकारी यांच्या समवेत घेण्यात आलेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
म्हापसा नगरपालिका मंडळ व श्री देव बोडगेश्वर कार्यकारणी यांची संयुक्त बैठक म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, देव बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर, सचिव ऍड. वामन पंडित, खजिनदार श्यामसुंदर पेडणेकर, सदस्य सुशांत गावकर, अमेय कोरगावकर, इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पालिका मंडळाचे नगरसेवक ऍड. तारक आरोलकर, आशीर्वाद खोर्जूवेकर, सुधीर कांदोळकर, अन्वी कोरगावकर, विराज फडके, साईनाथ राऊळ, डॉ. नूतन बिचोलकर व इतर नगरसेवक उपस्थित होते.
म्हापसा नगरपालिका एक दिवस त्या मंदिरामध्ये पूजा करणार असून त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येणार असल्याचे नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले. हा खर्च नगरसेवकांकडून घेणे राहिलेली काही रक्कम पालिका फंडातून वापरण्यात यावी असे ठरविण्यात आले आहे. दरवषी या जत्रोत्सवात गोबी मंचुरीयन व भेळपुरीवाले येतात त्यांच्यापासून अनेक लोकांना ते खाद्यपदार्थ उघडय़ावरील खाल्यामुळे त्रास होतो याची दखल घेण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे संपर्क साधून त्यांना या व्यापाऱयांकडे हे पदार्थ विकण्याचा परवाना आहे का असे तपासून पहावे आणि त्यांनाच या ठिकाणी व्यवसाय करण्यास देण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही ठरवण्यात आले आहे.
दरवषी उपस्थित दुकानदारांना बसण्यास मिळत नव्हते त्यासाठी यावषी एका रांगेमध्ये दुकानदारांना बसण्याची सोय करून देण्यात येणार असल्याचेही ठरविण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून प्लॅस्टिक मुक्त जत्रोत्सव झालेला आहे त्याचप्रमाणे यंदाचाही जत्रोत्सव प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी दर प्रत्येक दुकानदारांना प्लास्टिकच्या आपल्या दुकानदारांना पिशव्या दिल्या जातील आणि प्रत्येकी 10-10 दुकानदारांच्या ठिकाणी एक कचरापेटी ठेवण्यात येणार असल्याचेही ठरवण्यात आले. यातील काही दुकानदाराने जर कचरा अस्ताव्यस्त स्थितीत टाकला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बोलले गेले.
जत्रोत्सवामध्ये वाहतुकीची कोंडी मोठय़ा प्रमाणात होते ती कोंडी यावषी होऊ न देता त्यासाठी उपाय योजना म्हणून नऊ तारा हॉटेलच्या रस्त्याच्या बाजूला जे व्यापारी व्यापार घेऊन बसतात त्यांना त्यातून त्या ठिकाणी बसवणार नसल्याचेही सांगण्यात आले असून त्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा मोकळी करून देण्यात येणार असल्याचेही पालिका मंडळ व देवस्थानच्या कार्यकारिणीने ठरविले आहे. त्यासाठी म्हापशाचे आमदार, ट्राफिक पोलीस, म्हापसा पोलीस, अग्निशामक दल यांची संयुक्त बैठक म्हापसा कॉन्फरन्स रूममध्ये घेण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. संध्याकाळी ही उशिरा बैठक झाली होती. बैठकीमध्ये नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मुख्याधिकाकारी देश शिरवईकर, अध्यक्ष आनंद भाईडकर, वामन पंडित, खजिनदार श्यामसुंदर पेडणेकर, नगरसेवक विराज फडके, आशीर्वाद खोर्जुवेकर, साईनाथ राऊळ, अन्वी कोरगावकर यांनी भाग घेतला.









