राजन घाटे यांची मागणी
पणजी : म्हादई व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती हा कर्नाटकचे म्हादईवरील अतिक्रमण रोखण्याच्या दिशेने सौम्य परंतु योग्य उपाय आहे. म्हणूनच व्याघ्र क्षेत्र आरक्षित करा अशी मागणी सेव गोवा सेव म्हादईचे राजन घाटे यांनी केली आहे. म्हादई वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रिया आवश्यक आहेत. परंतु गोमंतकीयांचे ध्येय साध्य होण्यासाठी वेळ लागणार किंवा त्याला अनेक फाटेही फुटू शकतात म्हणूनच व्यघ्र क्षेत्र आरक्षित करा अशी मागणी घाटे यांनी केली आहे. काल येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजन घाटे बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत अॅङ सदानंद वायगंणकर, मारीयानो फेर्रांव व अन्य उपस्थित होते. व्यघ्र क्षेत्र आरक्षित करण्याच्या मागणी बाबत जनजागृती करण्यात येणार असून त्याची सुऊवात आजपासून पेडणे तालुक्यातून होणार आहे असेही घाटे म्हणाले. पेडणेतील केरी पंचायत क्षेत्रातून मोटर सायकल रॅलीला सुऊवात केली जाणार असून प्रत्येक पंचायतीला व्यघ्र क्षेत्र आरक्षित करण्यासाठी मागणी करणारा ठराव घेण्यात यावा या साठी निवेदन दिले जाईल. रॅली संपूर्ण दिवसभर प्रत्येक पंचायतीला भेट देणार असून नंतर पेडणे पालिकेला निवेदन देऊन भगवती मंदीराच्या जवळ असलेल्या पटांगणात जाहिर सभा होणार आहे. असेही घाटे म्हणाले.
गोवा वनविभागाने केलेल्या वन्यजीव गणनेत 1993 पासून म्हादई वन्यजीव अभयारण्यात वाघांची उपस्थिती असल्याचे सूचित केले होते. विभागाने कॅमेरा ट्रॅपद्वारे देखील अभयारण्यात वाघांची उपस्थिती पाहिली होती. जानेवारी 2020 मध्ये अभयारण्यात चार वाघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. गावकरी देखील वाघांच्या अस्तित्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे म्हादई वन्यजीव अभयारण्य व्यघ्र क्षेत्र आरक्षित करणे मोठे कठीण काम नाही असेही घाटे यांनी सांगितले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही गोव्यातील व्याघ्र प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी गोव्यातही व्याघ प्रकल्पाच्या निर्मितीची शिफारस केली. विशेष म्हणजे, हे प्रकल्प राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे चालवले जातात, प्रशासित केले जातात असेही घाटे यांनी सांगितले. म्हादई नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्यावरून कर्नाटक राज्यासोबत बराच काळ वाद सुरू आहे. कर्नाटक सर्व प्रकारच्या फसव्या आणि राजकीय मार्गांनी नदीचे पाणी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. म्हादई ही गोव्यातील निम्म्या लोकसंख्येसाठी पिण्याचे पाणी आणि जीवनशैलीच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी जीवनरेखा आहे. कर्नाटकच्या अतिरेकामुळे नदीचे पात्र पाण्याविना कोरडे पडणे किंवा पाणी कमी होणे 194 गावांतील गोवावासीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करेल. पर्यावरण आणि पर्यावरणीय जैवविविधता धोक्यात येईल, गोव्याची परिस्थिती धोक्यात येईल.म्हणूनच म्हादई वाचविण्याचा सोपा मार्ग म्हणजे म्हादई वन्यजीव अभयारण्य हे व्यघ्र क्षेत्र म्हणून आरक्षित करावे अशी मागणी राजन घाटे यांनी केली आहे.









