मिरामार किनारी उद्या अनोखा उपक्रम : 8 हजार लोक सहभाग घेण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
म्हादई नदीच्या रक्षणासाठी सरकारचे लक्ष वेधणे तसेच जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंट’ संघटनेच्या नेतृत्वाखाली जागृत पर्यावरणप्रेमींनी सात किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दि. 20 रोजी मांडवी नदीच्या तिरावर आयोजित या आंदोलनात सुमारे 8 हजार लोक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
‘गोवा हेरिटेज अॅक्शन ग्रुप’ आणि ‘सेव्ह म्हादेई, सेव्ह गोवा फ्रंट’ संघटनेतर्फे गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत अभियानाचे निमंत्रक इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी जॅक अजित सुखिजा, महेश म्हांबरे, अॅड. हृदयनाथ शिरोडकर, तनोज अडवलपालकर आदींची उपस्थिती होती.
ही मानवी प्रार्थना साखळी मिरामार बीचच्या टोकापासून ते पणजीतील सांता मोनिका जेटीपर्यंत सात किलोमीटरची असेल. त्यात अनेक प्रसिद्ध मान्यवर, स्वयंसेवी संस्था, राजकारणी यांच्यासह संपूर्ण गोव्यातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न असून म्हादईचा इतिहास आणि तिच्या आत्म्याशी एकरूप होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
‘ओपिनियन पोल’चे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याला महाराष्ट्रात विलीन होण्यापासून वाचवले. त्यामुळे गोमंतकीयांची ओळख सुरक्षित केली. आता म्हादई नदीचा कर्नाटकात होणारा विलय रोखण्यासाठी सिक्वेरा यांचा नातू जॅक अजित सुखिजा हेही या आंदोलनाशी जोडले गेले आहेत. आपण सर्वांनी या कार्याला पाठिंबा देण्याची आणि संघटित होण्याची गरज आहे, असे साखरदांडे यांनी सांगितले.
त्यावेळी बोलताना सुखिजा यांनी, ‘म्हादई ही आमची आई असून या नदीचे महत्त्व ओळखून तिच्या संरक्षणासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यामुळे तमाम गोमंतकीयांनी या आंदोलनात सहभागी होऊन म्हादईला वाचविण्यासाठीच्या लढ्यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आम्ही सर्वजण संघटीत झाल्यास या चळवळीला पुढे जाण्यासाठी अनेक सकारात्मक कल्पना मिळू शकतात. जनआंदोलनाने सरकारला खात्री पटू शकते. त्यामुळे मी सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असे सुखिजा पुढे म्हणाले.
गोवा आणि कर्नाटक सध्या म्हादई नदीवरील कळसा-भंडुरा धरण प्रकल्पाच्या वादात अडकले आहेत. अशावेळी या गंभीर प्रश्नाकडे जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक असून त्याचाच भाग म्हणून उद्या आयोजित करण्यात आलेल्या मानवी साखळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन फ्रंटतर्फे करण्यात आले आहे.









