जलस्रोतमंत्री शिरोडकर उद्याच केंद्रीय मंत्र्यांना भेटणार
प्रतिनिधी /पणजी
म्हादईच्या प्रश्नावर गोव्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील गोवा सरकारच्या तीन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असून त्यातील एकावर उद्या सुनावणी घेतली जाणार आहे.
त्याच तारखेला जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हे केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना मध्यप्रदेश येथे भेटणार आहेत आणि गोव्याची बाजू मांडणार आहेत. मध्यप्रदेश येथे दोन्ही मंत्र्यांची बैठक निश्चित झाली आहे. म्हादईचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्व मार्गांनी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती शिरोडकर यांनी दिली आहे.
आव्हान, अवमान याचिकेचा पर्याय : पांगम
दरम्यान, ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याला कल्पना न देता प्रकल्प अहवालास केंद्राने कशी काय मंजुरी दिली? हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत हा मुद्दा मांडण्याची संधी आहे. त्याशिवाय देण्यात आलेल्या मंजुरीला आव्हान देण्याचा तसेच अवमान याचिका सादर करण्याचा पर्यायही खुला असल्याचे पांगम यांनी नमूद केले.
नदीचे पाणी वळवता येत नाही, पर्यावरण परवाना, वन्य जीव मंडळाचा परवाना व इतर परवाने असल्याशिवाय धरण बांधता येत नसल्याचे पांगम यांनी सांगितले. म्हादई प्रश्नावर कायदेशीर लढाई देण्याची तयारी गोवा सरकारने केली असून मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्प अहवालाची (डिपीआर) प्रतीक्षा करण्यात येत असल्याचे पांगम म्हणाले.









