लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी लागली की सुट्टीत काय काय करायचं याची चर्चा सुरू व्हायची. खेड्यापाड्यातली मुलं मामाच्या शेतावर आजोळी जाऊन बैलगाडीचा प्रवासाचा आनंद लुटायचे तर कोणी टांग्यातून घोडागाडीचा आस्वाद घ्यायचे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला एखाद्या जादूच्या नगरीतील वाटावे तशी कोळशावर चालणारी झुक झुक गाडी म्हणजे प्रचंड कौतुकाचा विषय. पुण्यातील पेठेतील पोरं स्टेशनवर गाडी बघायला सायकल मारत निघालेली असायची तर डोंबिवलीचे मुंबईकर जवळपासच्या टेकड्यांवर वळण घेत येणारी रेल्वे बघायला मुद्दाम जायचे. पुण्याकडे येताना दोन इंजिने गाडी कशी व्यवस्थित नेते हे बघणंसुद्धा एक मजेचा भाग असायचा. ते पाहिलं की तंत्रज्ञान किती पुढे गेले म्हणून चर्चा रंगायची. गाडीचा आवाज, इंजिनचा धूर, गार्डचा डबा सगळं कसं आमच्या जगण्याचा भाग बनून गेला होता. आमच्या घरातच आमचे आई-बाबा म्हणजे इंजिन व्हायचे. मुलं म्हणजे मधले डबे आणि आजोबाआजींना मात्र गार्डचं काम द्यायचं. कारण त्यांना भरभर चालता येत नाही. मुलांच्या खेळातसुद्धा ही गाडी असायचीच. प्रत्येक जण एकमेकांचा सदरा धरून इंजिन नेईल तिकडे पळायचे आणि संथ चालणाऱ्या बावळट मुलांना गार्डच्या डब्याचं काम मिळायचं कारण या मुलांमुळे आमचे डबे तुटायचे आम्ही पडायचं, जखमी व्हायचं. म्हणूनच अशी मंडळी गार्डच्या डब्यासाठी नेमले जायचे आणि बरेचदा हा गार्डचा डबा, गाडी जोरात पुढे गेल्यामुळे जागेवरच राहायचा. ही झुक झुक गाडी पुढे कवितेतून सारखी भेटली. नंतर मात्र ती कित्येक लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली. ही झुक झुक गाडी आम्हा पुणेकरांना पेशवे पार्कमध्ये भेटायची. गाडीत बसताना आईबाबांचा हात सुटताना उगीचच डोळ्यात पाणी यायचे. पण मज्जा यायची, प्राण्यांच्या पिंजऱ्यावरून, उंचावरून ऐटीत पुढे जाताना आम्ही अगदी इंग्लंडच्या राजा राणीसारखे सगळे राज्य बघत बघत पुढे जायचो. त्या फेरीनंतर मिळणारी भेळ, शेंगदाणे, कैरी, काकड्या म्हणजे अगदी पर्वणी असायची. फुलराणीतून खाली उतरताना मनोमन ठरवून गेलेलं असायचं की आपण गाडीचा गार्ड नक्की व्हायचं कारण गार्डला जे काही महत्त्व असायचे त्याला तोडच नव्हती. त्याने झेंडा हलवल्याशिवाय गाडी हलायचीच नाही. पुढे मात्र मुंबईत लोकल सुरू झाल्या. पुढे ब्रॉडगेजच्या गाड्या पहायला मिळाल्या. पण धुराचे इंजिन मनात घर करून राहिले ते कायमचेच. आम्ही हे सगळं अनुभवत असताना रशियात मात्र मेट्रो सुरु झाली होती. जी आमच्या भारतात 100 वर्षांनी आता सुरू आहे. त्याचे नवल आम्हाला आहेच. आमच्या लहानपणी एक चित्र कायम आम्ही पाहिल्याचं आठवतं. पाण्यात जाणारे जहाज. कोणत्या इमारतीवरून मेट्रो जाणार याची चर्चा जोरदार सुरू होते. वाहतुकीची कोंडी सुटणार म्हणून मनातल्या मनात आशा पल्लवी झाल्या आणि एक दिवस प्रत्यक्षात ही मेट्रो अवतरलीसुद्धा. आता प्रत्येक जण आपल्या मुलांना नातवंडांना घेऊन या मेट्रोचा प्रवास करायला अगदी उत्सुक झाले होते. मी आपलं माझ्या मनात फुलराणी बघायला जाण्याचा आनंद मनात ठेवूनच आत्ताच्या पिढीला मेट्रो दाखवून घ्यावी म्हणून निघाले. तिथे जाताना गाडीला पार्किंग नसल्यामुळे रिक्षेतूनच आम्ही मेट्रोपर्यंत पोहोचलो. तिथे गेल्यावर मात्र सरकणारे जिने आम्ही चालल्या शिवाय आम्हाला वर घेऊन गेले. छोटे तिकीट एका यंत्रावर लावल्यानंतर पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मेट्रोच्या ट्रॅकजवळ उभे राहिलो. कुठलाही आवाज न करता मेट्रो आली आणि आवाज न करताच दरवाजा उघडला. पुन्हा अनाउन्समेंट होऊन आपोआप दरवाजे लागले आणि मेट्रो निघाली. कुठे आवाज नाही. गडबड नाही. गोंधळ नाही. सगळं कसं पॅकबंद, टापटीप, कुठून कुठे जातोय हे कळायला मार्गच नव्हता. पळती झाडे पाहूया हे म्हणायला काही संधीच नव्हती. फक्त इमारतींचे आणि जाहिरातींचे वरचे भाग मागे जात होते किंवा बोगद्यातून आपण एकटेच निघालोय असंही वाटत होतं. आम्ही बसलोय म्हणेपर्यंत उतरायची वेळ आली आणि आम्ही ठरलेल्या जागी पोचलोसुद्धा. अशी ही मेट्रो राणी लोकांच्या किंवा कामगारांच्या सोयीची असली तरी मुलांच्या पसंतीला फुलराणीसारखे उतरेलच असं मात्र नाही. कारण प्रवास आणि प्रवासाची तयारी याची मजाच या सगळ्यातून निघून गेली. फुलराणीत बसायची आनंदाची ओढ संपली, ही फुलराणी परिच्या राज्यात गेल्यामुळे, वास्तवातली मेट्रो आता स्वीकारायला हवी. आजूबाजूच्या आवाजात डोक्यावर कुणीतरी मिरे वाटतंय ही कल्पना मात्र आता मेट्रोमुळे साकार झाली.
Previous Articleअपोलो ट्यूब्सचे समभाग घसरणीत
Next Article स्क्वॅशमध्ये भारताची तीन पदके निश्चित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








