ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शहरातील लोकांचं जीवनमान उंचावायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवावी लागेल. भारतातील अनेक शहरांत मेट्रोचा विस्तार होत आहे. नवनवीन फ्लायओव्हर बनवले जात आहेत. 2014 पर्यंत देशात 250 किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. आता हे नेटवर्क 800 किमीहूनही जास्त आहे. 2014 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रो सेवा होती आता देशात 20 शहरात मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्ये देखील मेट्रो नेटवर्कचा विस्तार होत आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा आहे. मेट्रो आता आधुनिक भारताच्या शहरांची नवी लाईफलाईन बनत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारादरम्यान वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो सेवेचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी नागरिकांशी संवाद साधला.
मोदी म्हणाले, ऑगस्ट महिना हा उत्सव आणि क्रांतीचा आहे. क्रांतीच्या महिन्यात मला इथे येण्याचे भाग्य मिळालं. पुण्याने अनेक क्रांतीकारक देशाला दिले आहेत. पुणे देशाची अर्थव्यवस्थेला गती देण्यात, देशातल्या तरुणांच्या स्वप्नांना पूर्ण करणारे जिवंत शहर आहे. आज जे प्रकल्प या शहरांना मिळाले आहेत, त्यामुळे हे अजून सशक्त होणार आहेत. यासाठी आमचे सरकार जोराने काम करत आहे. फक्त पाच वर्षात पुण्यात 24 किलोमीटरची मेट्रो सुरु झाली आहे. हजारो कुटंबांना पक्की घरे मिळाली आहेत. या प्रकल्पांसाठी मी पुणेकरांना शुभेच्छा देतो. आमचं सरकार शहरात राहणाऱया मध्यमवर्गीयांच्या राहणीमानाबाबत गंभीर आहे, असेही मोदी म्हणाले.








