765 कोटींची सरकारकडून थकबाकी : विविध योजनांचे अनुदान न दिल्याने फटका
बेळगाव : राज्य सरकार व विविध सरकारी विभागांच्या थकीत वीजबिलामुळे विद्युत विभाग आर्थिक अडचणीत सापडला आहे. हेस्कॉमची तब्बल 765 कोटी 56 लाख रुपयांची सरकारकडून थकबाकी आहे. विविध योजना सरकारकडून राबविल्या जातात. त्याचे अनुदान मात्र हेस्कॉमला दिले जात नसल्याने हेस्कॉमला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राज्य सरकारकडून अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांसाठी मध्यंतरी मोफत वीज योजना राबविण्यात आली. नागरिकांनी वापरलेल्या विजेची रक्कम राज्य सरकारकडून हेस्कॉमला अनुदानाच्या रुपात दिली जाते. परंतु, मागील अनेक वर्षांपासून हे अनुदान बंद असल्याने थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत वीज दिली जाते. परंतु, त्यांनी वापरलेल्या विजेची रक्कम सरकारला हेस्कॉमकडे जमा करावी लागते. मागील काही वर्षांपासून शेतीसाठी पुरविल्या जाणाऱ्या विजेची 1 हजार 340 कोटी रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी हेस्कॉमने सरकारकडून जमा करून घेतली. अनुदान मंजूर झाले असले तरी सरकारच्या विविध विभागांकडून वापरली जाणारी विद्युतबिले मात्र थकीत आहेत. सरकारी व खासगी असे मिळून एकूण 3 हजार 666 कोटी रुपयांचे बिल थकविण्यात आल्याने हेस्कॉमची आर्थिक कोंडी होत आहे. सर्वसामान्यांचे वीजबिल जमा करून घेताना दोन दिवस जरी उशीर झाला तर त्यांचा वीजपुरवठा बंद केला जातो. परंतु, सरकारी विभागांना मात्र लाखो रुपयांची थकबाकी असली तरी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
थकीत वीजबिल टप्प्याटप्प्याने भरून घेण्यासाठी प्रयत्न
सर्वांनी वीजबिल भरले तरच हेस्कॉममधील कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकते. अनेक दिवसांपासून काही विभागांचे वीजबिल थकीत आहे. हे थकीत वीजबिल टप्प्याटप्प्याने भरून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
– मोहम्मद रोशन (व्यवस्थापकीय संचालक हेस्कॉम)









