डिसेंबरमध्ये मुंबई, कोलकातासह चार शहरांना भेट : पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाचा केरळ दौरा रद्द झाल्यामुळे निराश झालेल्या भारतीय फुटबॉलप्रेमींना आता दिलासा मिळाला आहे. स्पर्धात्मक सामना खेळण्यासाठी दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी येणार नसला, तरी तो वर्षाअखेरीस भारताच्या दौऱ्यावर येणार असून मुंबईसह चार शहरांना भेट देणार आहे. मेसीच्या या दौऱ्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
फुटबॉलवेडे शहर’ अशी ख्याती असलेल्या कोलकातापासून (12 डिसेंबर) या दौऱ्याला सुरुवात होईल. याठिकाणी त्याच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. यावेळी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेस्सी सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अर्थात ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ फुटबॉलपटू आहे. त्यामुळेच मेसीच्या या दौऱ्या ‘गोट टूर ऑफ इंडिया 2025’ असे नाव देण्यात आले आहे. कोलकातानंतर अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांनाही तो भेट देईल. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 15 डिसेंबर रोजी मेस्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे नियोजित असून त्यानंतर त्याच्या या दौऱ्याची सांगता होईल, असे आयोजन सताद्रु दत्ता यांनी सांगितले आहे.
मेस्सीचा दुसरा भारत दौरा, युवा खेळाडूंना करणार मार्गदर्शन
मेस्सीचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी तो 2011 मध्ये आला होता. त्यावेळी तो अर्जेंटिना संघातून व्हेनेझुएलाविरुद्ध सामना खेळला होता. ही लढत कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झाली होती. दरम्यान, ‘मेस्सीच्या दौऱ्याचे हक्क माझ्याकडे आहेत. मेस्सी 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान समाज माध्यमांवरून या दौऱ्याची अधिकृत घोषणा करणार आहे, असे दत्ता यांनी सांगितले. दत्ता यांनी या वर्षाच्या सुरुवातीस मेस्सीच्या वडिलांची भेट घेतली होती. त्यानंतर मेस्सी आणि दत्ता यांची मेस्सीच्या घरी पाऊण तास चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, मेस्सी प्रत्येक शहरात लहान नवोदित फुटबॉलपटूंना मौलिक सूचनाही देणार आहे. मेस्सीसह त्याचे इंटर मियामी संघातील सहकारी रॉद्रिगो डे पॉल, लुईस सुआरेझ, जॉर्डी अल्बा हेही येण्याची शक्यता आहे.









