वृत्तसंस्था/ अटलांटा (अमेरिका)
लायोनेल मेस्सीने क्लब वर्ल्ड कपमधील पहिला गोल एका उत्कृष्ट फ्री किकवर केला आणि इंटर मियामीला दोन वेळचे युरोपियन विजेते पोर्तोवर 2-1 असा विजय मिळवून दिला.
मध्यांतरापर्यंत इंटर मियामी 1-0 ने पिछाडीवर होते, परंतु टेलास्को सेगोव्हियाने दुसऱ्या सत्रास सुरुवात झाल्यानंतर दोन मिनिटांत मार्सेलो वेइगँड्टच्या बॉक्समधील क्रॉसवर गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर 37 वर्षीय अर्जेंटिनाच्या खेळाडूने गोल करून आघाडी वाढविली. पोर्तोतर्फे सुऊवातीच्या मिनिटांतच समू ओमोरोडियनने पेनल्टी किकवर गोल केला. पोर्तुगीज क्लबच्या स्पर्धेतील या पहिल्या गोलचे व्हिडीओ पुनरावलोकनही करण्यात आले. दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या गट ‘अ’ सामन्यात गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
मैदानाच्या मध्यभागी धावताना रॉड्रिगो मोराने मेस्सीला पेनल्टी एरियाच्या बाहेर खाली पाडले आणि मर्सिडीज-बेंझ स्टेडियममधील प्रेक्षकांनी मेस्सीच्या नावाचा जयजयकार सुरू केला. मेस्सीनेही त्यांना निराश न त्याच्या डाव्या पायाच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर पोर्तोच्या खेळाडूंची भिंत ओलांडली आणि 54 व्या मिनिटाला गोल केला. इंटर मियामीने आता हार्ड रॉक स्टेडियमवर ब्राझिलियन क्लब पाल्मिरासवर विजय मिळविल्यास 16 संघांच्या फेरीत त्यांचे स्थान निश्चित होईल. विजयाची अत्यंत गरज असलेल्या पोर्तोचा आता गटातील शेवटचा सामना न्यू जर्सीच्या ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर इजिप्तच्या अल अहलीविऊद्ध होईल.
दुसरीकडे, क्मलब वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात बोटाफोगोने चॅम्पियन्स लीग विजेत्या पॅरिस सेंट-जर्मेनला 1-0 असे हरवले. गुऊवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यातील पहिल्या सत्रामध्ये इगोर जिझसने हा गोल केला.









