फुटबॉलचा विश्वचषक आपल्या देशाला जिंकून देण्यात मोलाचे योगदान देणारा विश्वविख्यात खेळाडू आणि अर्जेंटिनाचा कप्तान लिओनेल मेस्सी जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयसिंहासनावर तर विराजमान झाला आहेच, शिवाय आता तो अर्जेटिनाच्या नोटांवरही दिसणार आहे. अर्जेटिनाला तिसऱयांदा फुटबॉलचा विश्वचषक मिळवून देणारा मेस्सीला नोटांवर स्थान देण्यासाठी त्या देशाच्या सरकारने विशेष योजना सज्ज केली आहे. त्या देशाच्या अर्थविभागाने या योजनेवर गांभीर्याने विचार चालविला असून लवकरच त्यासंबंधात निर्णय होणार आहे.
पण अर्जेटिनातील मेस्सीचे ‘भक्त’ सरकारने निर्णय घेण्याचीही वाट पहाण्यास तयार नाहीत. अनेकांनी त्याचे छायाचित्र नोटांवर टाकून अशा नोटा सोशल मिडियावर प्रसिद्धही करण्यास प्रारंभ केला आहे. मेस्सीचे छायाचित्र अर्जेटिनाच्या 1,000 च्या नोटेवर मुद्रित करण्यात येणार आहे, असे अनधिकृत वृत्त आहे. नोटांवर छायाचित्र मुद्रीत होणारा तो कदाचित जगातील प्रथमच खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. मेस्सीने 5 विश्वचषक स्पर्धांमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळलेले असून एकंदर 16 गोल केलेले आहेत. नुकत्याच संपलेल्या विश्वचषकाच्या अंमित खेळामध्ये त्याने 2 गोल करुन आपल्या संघाला विजयी केले. तो विश्वातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे का, या प्रश्नावर फुटबॉल प्रेमींचे एकमत होत नसले, तरीही तो सर्वोत्कृष्टांपैकी एक आहे, यावर सर्वांचे एकमत आहे.
तर अशा या मेस्सीचे छायाचित्र नोटांवर पाहण्यासाठी त्या देशातील नागरीक उत्सुक आहेत. त्यांचा मोठा दबाव पाहता, अर्जेटिना सरकारला नोटांवर त्याचे छायाचित्र मुद्रीत करावे लागेल, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास तो एका महान खेळाडूचा महान सन्मान ठरणार यात शंका नाही.









