वृत्तसंस्था/ लंडन
अर्जेंटिनाचा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीची 2023 सालासाठी फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू तर महिलांच्या विभागात स्पेनची ऐताना बोनमेटी हिची सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली.
लंडन येथे झालेल्या फिफाच्या पुरस्कार वितरण समारंभावेळी जागतिक फुटबॉल क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरूषांच्या विभागात फिफाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराकरीता प्रामुख्याने अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी, हेलँड यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मात्र या पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड करण्याकरीता निवड समिती सदस्यांमध्ये बरेच मतभेद निर्माण झाले होते. पण अखेरिस मेस्सीची वादग्रस्तरित्या या पुरस्काराकरीता फिफाने घोषणा केली. मेस्सीने फिफाचा हा पुरस्कार आतापर्यंत तीन वेळा मिळविला आहे. 2022 च्या डिसेंबरमध्ये झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाला जेतेपद मिळवून देण्यात मेस्सीची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यानच्या मेस्सीच्या विविध स्पर्धातील कामगिरीचा आढावा घेऊन निवड समिती सदस्यांनी मेस्सीला हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. 33 वर्षीय मेस्सीचा पॅरिस सेंट जर्मन (पीइसजी) क्लब बरोबरचा करार संपुष्टात आला आणि तो गेल्या जूनमध्ये इंटर मियामी क्लबमध्ये दाखल झाला. इंटर मियामीमध्ये दाखल झाल्यानंतर मेस्सीच्या कामगिरीमुळे या क्लबने गेल्या ऑगस्टमध्ये लिग स्पर्धेतील अजिंक्यपद पहिल्यांदाच मिळविले. अमेरिका फुटबॉल क्षेत्रामध्ये मेस्सीचा दबदबा अधिकच वाढला आहे. फिफाच्या या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये मेस्सीचा प्रतिस्पर्धी हेलँड याने मँचेस्टर सिटी क्लबकडून खेळताना चॅम्पियन्स लिग, प्रिमियर लिग आणि एफए चषक फुटबॉल स्पर्धेत 52 गोल नोंदविले होते. मँचेस्टर सिटी क्लबला त्याने 2023 च्या कालावधीत चॅम्पियन्स लिग, प्रिमियर लिग आणि एफए चषक स्पर्धा जिंकून दिली आहे. फिफाच्या या पुरस्कारासाठी निवड समितीने विविध देशांच्या राष्ट्रीय संघाच्या कर्णधार, प्रशिक्षक, पत्रकार आणि शौकिन यांच्याकडून नामांकन मागविली होती. फिफाने नामांकनाला प्रथम प्राधान्य देण्याचे जाहिर केले. फ्रान्सचा कायलिन एम्बापे याला या पुरस्कार निवडीमध्ये तिसरे स्थान मिळाले. लंडनमध्ये झालेल्या फिफाच्या या पुरस्कार वितरण समारंभावेळी पुरूष विभागातील निवड करण्यात आलेले पहिले तीन विजेते उपस्थित राहिले नाहीत. अर्सनेल आणि फ्रान्सचा थिएरी हेन्री याने मेस्सीच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
महिलांच्या विभागात स्पेनची ऐतेना बोनमेटीची फिफाच्या 2023 सालातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी निवड करण्यात आली. 25 वर्षीय बोनमेटीने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर स्पेनला फिफाची महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली. तसेच तिने बार्सिलोना महिला फुटबॉल संघाला चॅम्पियन्स लिगचे जेतेपद मिळवून दिले. बोनमेटीने महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ‘बलून डी ओर’ तसेच गोल्डन बॉल आणि युफाची 2023 सालातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा बहुमान मिळविल्याने फिफाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराकरीता बोनमेटीची निवड जवळपास निश्चित झाली होती. मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबला ऐतिहासिक चॅम्पियन्स लिगचे जेतेपद मिळवून दिल्याबद्दल सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षक पेप गार्डीओला यांची निवड करण्यात आली. फिफातर्फे 2023 सालातील सर्वोत्तम संघाची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये मँचेस्टर सिटीचे कायली वॉकर, जॉन स्टोनेस, रूबेन डायस, बर्नाडो सिल्वा आणि केविन डी. ब्रुनी या पाच फुटबॉलपटूंचा समावेश आहे.









